सकाळी सकाळी व्यायामासाठी एनर्जी बूस्ट करायची असेल तर भिजवलेली चणाडाळ कच्ची किंवा थोडीशी वाफवून खाऊन बघा ! चणा डाळ नियमितपणे खाल्ली तर स्नायूंची ताकद वाढायलाही मदत होईल ! आपण रोजच्या आहारात चणा डाळ वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. भिजवलेली चणाडाळ सॅलड्स मध्ये चव आणि पोषकता देते. तर चणा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आपण भाज्यांना घट्टपणा येण्यासाठी वापरतो. बेसनापासून केलेला झुणका किंवा पिठलं हे तर लहान मोठ्या प्रत्येकाच्या आवडीचं असतं. बेसना पासून लाडू आणि इतर चविष्ट गोड पदार्थ पण तयार केले जातात.
इतर डाळींप्रमाणेच चणाडाळीतून भरपूर प्रोटीन्स, आयर्न फायबर्स मिळतातच त्याशिवाय चणा डाळीत काही विशेष गुणधर्म आहेत. चणाडाळ म्हणजेच हरभरा डाळीमध्ये उत्तम प्रमाणात फॉलिक अॅसिड असतं.या फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील होमोसिस्टीनची पातळी आटोक्यात ठेवायला मदत होते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी राहतं. रक्तवाहिन्यांचे काम तसंच रक्ताभिसरण सुरळीतपणे चालू राहतं. रोगकारक घटकांचा शरीरात होणारा प्रसार रोखायला मदत होते.चणा डाळी मधील कॅल्शियम मुळे हाड बळकट आणि वजनदार व्हायला मदत होते. चणा डाळीमध्ये एल ट्रिप्टोफॅन असतं, जे आनंदी आणि उत्साही मूड तयार करण्यास मदत करते. या डाळीतील विशिष्ट घटक ताणतणाव आणि चिंता आटोक्यात ठेवायला मदत करतात.
पचन संस्थेचं आरोग्य चांगले राखायला मदत करतात. चना डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात. ज्यांच्यामुळे शरीरात तयार होणाऱ्या अशुद्धी कमी व्हायला मदत होते. तसंच इंफ्लमेशन म्हणजेच शरीरांतर्गत दाह कमी व्हायला या डाळीचा फायदा होतो. या डाळीमधील फायबर्स तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि रक्तदाब आटोक्यात राहतो. चणा डाळीतील फायबर्समुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं, त्यामुळे खाण्यापिण्याचं प्रमाण आटोक्यात राहायला मदत होते. साहजिकच वजन नियंत्रणात राहण्यासाठी त्याचा फायदा होतो.