सुकेशा सातवळेकर (आहारतज्ज्ञ)
प्लांट बेस्ड प्रोटिन्सचा सगळ्यात चांगला स्त्रोत म्हणजे डाळी ! आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खातो पण त्यातही मूग डाळ सर्वात जास्त पोषक आहे. मूग डाळीतले वेगवेगळे पोषणदायी अन्नघटक शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात. इतर डाळींच्या मनाने मूग डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतातच आणि एक विशेष म्हणजे कार्ब्सचं प्रमाण मात्र कमी असतं. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसंच ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मूग डाळीचा खूप जास्त फायदा होतो. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजेच ही डाळ खाल्यावर रक्तातील साखर सावकाश वाढते आणि कमी प्रमाणात वाढते (world pulses day 2024 Moong Dal) .
मूग डाळीचे फायदे
१. मूग डाळीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मूग डाळीच्या सेवनानंतर पोट भरल्याचे समाधान मिळतं.
२. न पचलेलं अन्न बाहेर टाकायला मदत होते. तसेच इतर अन्नपदार्थ खाण्यावरती कंट्रोल राहतो.
३. मूग डाळ पचायला अतिशय सोपी आणि हलकी आहे. त्यामुळे आजारातून उठल्यावर अतिशय पोषक पण सहज पचणाऱ्या मूग डाळीचे सेवन फायदेशीर ठरतं.
४. मूग डाळी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची मात्रा चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे रक्तदाब आटोक्यात ठेवायला मदत होते.
५. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मूगडाळीमधील काही विशेष घटक मदत करतात. त्यामुळे हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मूग डाळीचे सेवन रोजच्या आहारात व्हायला हवं.
६. शरीरातील कोलेसिस्टोकायनिन हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मूगडाळ फायदेशीर ठरते. त्यामुळे मेटाबोलिक रेट म्हणजेच चयापचयाचा दर वाढतो. पोट भरल्याने खाण्यावर नियंत्रण राहते आणि वजन वाढत नाही.
७. मूग डाळीतून चांगल्या प्रमाणात लोह, कॉपर, फोलेट आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स मिळतात.
मुगडाळ खिचडी हा भारतीय आदर्श पदार्थ आहे ! भरपूर भाज्या घालून मूग डाळ खिचडी केली तर ती सर्व गुणसंपन्न ठरते !आपण मूग डाळीचे वरण किंवा आमटी सुद्धा रोजच्या आहारात खाऊ शकतो. मूग डाळ भिजवून सॅलेड मध्ये वापरता येते. मूग डाळीचा ढोकळा किंवा मूग डाळीच्या पिठाचं पिठलं किंवा झुणका तसंच मूग डाळ चिला / डोसा / पेसारट्टू हे पण पदार्थ चविष्ट आणि पोषक ठरतात.हिरवी मुगडाळ म्हणजेच सालासकट मुगडाळ वापरली तर फायबरची मात्रा वाढते. यामुळे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्सची मात्राही वाढते. हिरवी मूगडाळ सगळ्यात जास्त पोषक असते. त्यामुळे रोजच्या आहारात आवर्जून मूग डाळीचा वापर करायला हवा.
संपर्क
Amrut Ahar Nutri Clinic