भारतभरातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये प्रत्येक जेवणामध्ये तूरडाळ वापरली जाते. पश्चिमेकडे वरण किंवा आमटी दक्षिणेकडे सांबार आणि रस्सम तर उत्तरेकडे दाल फ्राय रोजच्या जेवणात असतेच. राजस्थानात दालबाटी हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भात,भाकरी,पोळी, रोटी किंवा डोसा बरोबर विविध स्वरूपात तूर डाळीचं वरण वापरलं की आहारातील प्रोटीन्सची मात्रा वाढते. प्रोटीनचा दर्जा सुधारतो, कारण अत्यावश्यक अमायनो ऍसिडची जोड मिळते. भारतीय चौरस आहारामध्ये तूरडाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे ! तूर डाळीमधून मिळणारे बी कॉम्प्लेक्स विटामिन नायसिन तसंच प्रोटीन आणि भरपूर प्रमाणातील फायबरमुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राहायला मदत होते. एच डी एल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढायला आणि एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी राहायला मदत होते.
डायबिटीस असणाऱ्या लोकांना कायमच ब्लड शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची चिंता असते. त्यांच्या रोजच्या आहारात दोन्ही जेवणामध्ये तूर डाळीचे वरण किंवा आमटी जरूर असावं. तूरडाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी म्हणजेच फक्त 29 आहे. म्हणजेच डाळ खाल्यावर ब्लड शुगर सावकाश आणि कमी प्रमाणात वाढते आणि पोषण मात्र व्यवस्थित होतं. मेटाबोलिझम म्हणजेच चयापचयाला चालना मिळते. पचन सावकाश होतं. खाण्याचं समाधान आणि तृप्ती मिळते. त्यामुळे अधून मधून सारखी लागणारी भूक कंट्रोलमध्ये राहते. कमी खाल्लं जातं आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहतं. तुर डाळीमधून मिळणाऱ्या कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम मुळे हाडांचा आरोग्य उत्तम राहतं. लहान मुलांची शरीर बांधणी चांगली होते तर मध्यमवयीन व्यक्तींची बोन डेन्सिटी चांगली राहते. तूर डाळी मधील भरपूर प्रमाणातील मॅग्नेशियम मुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरामय राहते.
इतर बहुतेक डाळींप्रमाणेच तूर डाळीतही पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. तूरडाळीतील फोलेट, लोह आणि प्रोटीनमुळे हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. सर्व शरीर पेशींना ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा होतो आणि शरीरांतर्गत क्रिया चांगल्या होतात. तूर डाळीमुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. तूर डाळ शिजवायच्या आधी रात्रभर किंवा किमान २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवावी. डाळ शिजताना त्यामध्ये हिंग, हळद घातल्यास त्यातील पोषकता वाढण्यास मदत होते. या डाळीत असलेले ट्रिप्सिन हे एंझाईम शरीरातील प्रोटीनचे पचन होण्यास उपयुक्त असते.