उडीद डाळ पोषणाने समृद्ध असून शक्तिवर्धक आणि बलवर्धक आहे. भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, आयर्न आणि फायबर्स देणाऱ्या उडीद डाळीचा वापर आपल्या आहारात आवर्जून करायला हवा. उडीद डाळीमुळे शरीराला आवश्यक कार्यशक्ती तर मिळतेच शिवाय स्नायूंची ताकद चांगली राहते. हाडांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. उडीद डाळीची आणखी एक विशेषता म्हणजे गट हेल्थ म्हणजेच पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. पोटातील उपयुक्त जिवाणूंची वाढ व्हायला मदत होते आणि हानिकारक जिवाणूंचे प्रमाण कमी करायला मदत होते. उडीद डाळीचा वापर दाक्षिणात्य पदार्थांमध्ये म्हणजेच इडली, डोसा, उतप्पा यांमध्ये होतो. तसेच उडदाची आमटी, वडे हे पदार्थही छान होतात. उडदाचे पापड आपल्याकडे आवर्जून केले जातात. पाहूयात आहारात उडदाची डाळ घेण्याचे फायदे...
१. उडीद डाळीचा वापर आपण अन्नपदार्थांमध्ये करतोच, पण त्याबरोबरच आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा उडीद डाळीचा वापर होतो. विशेषतः त्वचेच्या समस्यांवरील औषधोपचारांमध्ये उडीद डाळ वापरली जाते.
२. तसंच शरीरांतर्गत दाह कमी करण्यासाठी, मेटाबोलिक रेट वाढवण्यासाठी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी उडीद डाळ औषधी म्हणून उपयोगी पडते.
३.उडीद डाळीमुळे पचनशक्ती चांगली राहते. या डाळीमधील मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात जे न पचलेलं अन् शरीराबाहेर टाकायला मदत करतात.
४. डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लड शुगर नियंत्रित करायला उडीद डाळीचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो.
५. उडीद डाळीतील भरपूर प्रमाणातील फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतात.
६. रक्तवाहिन्यांतील ताण कमी करायला मदत होते. पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहायला मदत होते.
७. उडीद डाळीच्या नियमित सेवनामुळे लघवीचं प्रमाण योग्य ठेवायला मदत होते. शरीरातील अशुद्धी, हानिकारक घटक बाहेर टाकायला मदत होते.
८. उडीद डाळीच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढायला मदत होते. इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या आटोक्यात ठेवायला मदत होते असं काही अभ्यासशोधांवरून सिद्ध झालंय.