सॅण्डविज हा असा पदार्थ आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो आवडतो. या सॅण्डविजचा जन्म नेमका कसा झाला, याचीही एक रंजक गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये जॉन मॉन्टेंग्यू नावाचा एक व्यक्ती होता. त्याला कार्ड गेम खेळायला भारी आवडायचं. गेम खेळताना तो त्याच्या शेफला मीटचा तुकडा ब्रेडच्या दोन स्लाईसच्या मध्ये आणून द्यायला सांगायचा. असं केलं म्हणजे एका हातानी खाणंही व्हायचं आणि त्याचा गेमही थांबायचा नाही. हळूहळू त्याचं पाहून इतर लोकही तसंच करू लागले. आपापल्या चॉईसनी ब्रेडच्या स्लाईसमध्ये हवं ते टाकून खाऊ लागले आणि सॅण्डविजचे वेगवेगळे प्रकार अशा पद्धतीने उदयाला आले.
सॅण्डविज हा खरोखरच एक मस्त ब्रेकफास्ट आहे. जेवढा टेस्टी तेवढाच हेल्दी. सॅण्डविजची एक खासियत म्हणजे दोन ब्रेडच्या आत आपण खूप वेगवेगळ्या भाज्या दडवू शकतो. जी मुलं एरवी भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, ती मुलं विविध भाज्या घालून बनविलेले सॅण्डविज मात्र अवघ्या काही मिनिटात फस्त करतात. यम्मी खायला मिळतंय म्हणून मुलंही खुश आणि मुलांना भरपूर भाज्या खाऊ घातल्या म्हणून त्यांची आईही खुश... अशीच एक सुपर हेल्दी सॅण्डविज रेसिपी दिवाळीत तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अवश्य करून बघा. सॅण्डविज आणि दिवाळीचा फराळ असं कॉम्बिनेशन अफलातून हिट ठरेल. या सॅण्डविजमध्ये खूप भाज्या आहेत. त्यामुळे ब्रेड कमी आणि भाज्या जास्त असणारे हे सॅण्डविज सुपर
हेल्दी आहे. भाज्यांमुळे या सॅण्डविजची पौष्टिकता वाढते. त्यामुळे हे सॅण्डविज म्हणजे एक उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो.
सुपर व्हेजी सॅण्डविजसाठी लागणारे साहित्य
ब्रेड, सिमला मिरची, टोमॅटो सॉस, गाजर, कोबी, कांदा, बीट, काकडी, पुदिना, वाफवलेले स्वीटकॉर्न, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मेयोनिज, बटर, चीज
कसं बनवायचं सुपर व्हेजी सॅण्डविज ?
- स्वीटकॉर्न व्यतिरिक्त सगळ्या भाज्या कच्च्याच वापरायच्या आहेत. त्यामुळे सगळ्या भाज्या लहान लहान चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या.
- यानंतर या सगळ्या चिरलेल्या भाज्या एका बाऊलमध्ये टाका आणि त्यामध्ये मेयोनिज टाका.
- सगळ्या भाज्यांच्या तुकड्यांना व्यवस्थित मेयोनिज लागले पाहिजे. मेयोनिज हा या रेसिपीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मेयोनिज वापरण्यात कंजुसपणा मुळीच नकाे.
- यानंतर एक ब्रेडच्या दोन स्लाईस घ्याव्य. एका स्लाईसला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर मेयोनिज घालून मिक्स केलेले भाज्यांचे मिश्रण पसरून ठेवावे.
- भाज्या भरपूर टाकाव्यात. त्यामुळे ब्रेड कमी आणि भाज्या जास्त खाल्ल्या जातात.
- भाज्यांवर चिलीफ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकावे.
- यानंतर वरून आणखी एक ब्रेडची स्लाईस लावावी.
- दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला बाहेरच्या बाजूने बटर लावून घ्यावे आणि सॅण्डविज ग्रील करावे.
गरमागरम सुपर हेल्दी सॅण्डविज झाले तय्यार...