Join us  

गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी खास करावाच पारंपरिक पदार्थ 'नेवरी'! या नेवरीची चव लाजवाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 12:08 PM

कोकणात नेवरीला अतिशय महत्त्व. याबद्दल ऐकलेलं खूप असतं. पण ती करता येत नाही. ही अडचण सोडवून् नेवरी करुन बघण्याची हौस पूर्ण करण्यासाठी ही आहे नेवरीची पाककृती.

ठळक मुद्देनेवरीसाठीचं बेसन रवाळ हवं आणि ते खमंग भाजलं गेलं पाहिजे.बेसन भाजताना त्यात जराही तूप घालू नये.नेवऱ्या तळतांना त्यावर छोटे छोटे फोड यायला हवेत.

-प्राजक्ता प्रभू

 कोकणात एक वेगळी करंजी होते,नेवरी.पारंपरिक नेवरी मुरड /दुड घालून करायचे.कोकण त्यातही सिंधुदुर्ग इथे  नेवरी शिवाय गणपती पार पडत नाही.खास करून गौरी पूजनासाठी मुंबईकर आणि माहेरवाशीण यांच्याकरता नेवऱ्या मोठ्या प्रमाणावर होतात. गणपतीत भजनी मंडळी आरती करायला येतात त्यांना चहा आणि नेवऱ्या दिल्या की दोन आरत्या जास्त म्हटल्या जातात.

छायाचित्र- गुगल

कोकणी नेवरी कशी करणार?

पारंपरिक नेवरी कृतीत हरभर  डाळ खरपूस भाजून, तिचे जाडसर पीठ/बेसन दळून घेतात ,आपण इथे तयार बेसनाच्या नेवऱ्या बघू. यासाठी बेसन मात्र अगदी रवाळ हवं. १ वाटी रवाळ बेसन, पाऊण ते एक वाटी गूळ, पाव वाटी(कच्चा) सुके खोबरे किस, किंचित भाजून काळे तीळ, वेलची आणि  जायफळ पूड हे जिन्नस सारणासाठी घ्यावं.

आवरणासाठी २ वाटी मैदा, १/२ वाटी तांदूळ पीठ, २ मोठे चमचे बारीक रवा, तेल आणि मीठ घ्यावं.  नेवरी करताना आधी  बेसन मंद आचेवर अगदी खमंग अन कोरडं भाजून घ्यावं. तेल/ तूप अजिबात घालू नये. बेसन जितके कोरडे खरपूस कराल तितकी नेवरी चवदार होते.

छायाचित्र- गुगल

बेसन साधारण थंड झालं की, बारीक चाळणीतून चाळून घ्यावं. त्यामुळे त्यात गोळे राहात नाहीत.आता त्यात किसलेला गूळ घालून, व्यवस्थित एकजीव करून, मिक्सरमधून फक्त एक फेरा घ्यावा की ते सुरेख मिळून येतं. नंतर  त्यात खोबरे किस, काळे तीळ, वेलची आणि जायफळ घालून छान एकत्र करून ठेवावं..मैद्यात कडकडीत तेलाचं मोहन घालून  आणि त्यात थोडं मीठ , साखर, रवा पिठी घालून  एकदम घट्ट मळून किमान दिड तास झाकून ठेवावं.

छायाचित्र- गुगल

नंतर मैदा चांगला तिंबून तिंबून मऊ करून घ्यावा.  पाणी अजिबात लावू नये.तरच पारी खुसखुशीत होते. नंतर नेहमीप्रमाणे करंज्या करून,मध्यम आचेवर, छान लालूस तळून घ्याव्यात. नेवऱ्यांना छोटे छोटे फोड आले पाहिजेत.  नेवरी करताना दुड/मुरड येत असेल, तर ती करावी, किंवा नेहेमीप्रमाणे कातणीनं कापून घ्यावे. फार छान अन खमंग लागतात. तळताना तेलच वापरावं.

 ( लेखिका वालावल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आहेत.)