Join us  

नवरात्र स्पेशल: आजचा रंग पिवळा; आहारातले पिवळ्या रंगाचे पदार्थ कोणती 'ऊर्जा' देतात? यलो पॉवरचं वाचा महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 11:52 AM

नवरात्रीचे नऊ दिवस कपड्यांचे रंग फॉलो करताना आहारातही ते फॉलो करा, आरोग्यासाठी नक्की फायदा होईल

ठळक मुद्देरंगांशिवाय आयुष्याला मजा नाही असे म्हणत असतानाच याच रंगांचा तुमच्या आहारातही समावेश असायला हवा. अन्नाची चव, वास ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याचा रंगही तितकाच महत्त्वाचाजाणून घेऊया आजच्या पिवळ्या रंगाविषयी...

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे व्रतवैकल्ये, पूजाअर्चा यांनी सजलेले दिवस. या दिवसांत सजण्याधजण्यासाठी मागील काही वर्षांपासून रंग ठरविण्यात येतात. मग महिलावर्ग या रंगाचे कपडे, दागिने घालून ऑफीसला आणि घराबाहेर जातात. रंगांशिवाय आयुष्याला मजा नाही असे म्हणत असतानाच याच रंगांचा तुमच्या आहारातही समावेश असायला हवा. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास निश्चितच मदत होईल. अन्नाची चव, वास ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याचा रंगही तितकाच महत्त्वाचा असतो, विविधरंगी भाज्या, फळे व इतर अन्नघटकांचा आहारात समावेश ठेवल्यास ते नक्कीच पोषक आणि फायदेशीर ठरु शकते. चला तर मग आज असलेल्या पिवळ्य रंगाचे आहारातील महत्त्व जाणून घेऊया आणि कोणत्या पिवळ्या पदार्थांचा आहारात समावेश करता येईल ते पाहूया...

म्हणून आहारात पिवळे अन्नघटक असावेत...

हिरव्या भाज्या खाव्यात, लाल फळे आणि भाज्यांमधून शरीराला लोह मिळते, मीठ, साखर, मैदा यांसारख्या पांढऱ्या पदार्थांचे प्रमाण आहारात कमीत कमी ठेवावे असे आपण सर्रास ऐकतो. पण पिवळ्या भाज्या किंवा फळे आणि पिवळे पदार्थ आहारात असायला हवेत असे मात्र आपण ऐकत नाही. पण पिवळ्या भाज्या, फळे, हळद, डाळी यांसारखे घटक आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक असतात हे समजून घ्यायला हवे. या पिवळ्या भाज्यां आणि फळांमध्ये कॅरोटेनॉइड्स हा घटक असतो. त्यामुळे पदार्थांना पिवळा रंग येतो.  बीटा केरोटिन आणि बीटा-क्रिप्टोस्कँथिन अशा दोन घटकांपासून कॅरोटेनॉइड्स बनतात. पिवळी फळं किंवा भाज्या खाल्यानंतर या घटकांचे रूपांतर 'अ' जीवनसत्त्वामध्ये होतं. पिवळी फळं आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. ऑक्सिडंट्समुळे शरीरातील पेशींचे होणारे नुकसान टाळले जाते. बीटा-क्रिप्टोस्कँथिन आणि 'क' जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट्स मानली जातात, यामुळे पेशींचा बचाव होतो.

पिवळी फळं आणि भाज्यांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. यातल्या कॅरोटेनॉइड्सचं रूपांतर 'अ' जीवनसत्त्वात होत असल्याने डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. कॅरोटेनॉइड्समुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका अनेकपटींनी कमी होतो, असं हॉवर्ड मेडिकल स्कूलने केलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. पिवळा हा तजेलदार रंग मानला जातो, विविध रोग बरे करण्यासाठी आर्ट थेरेपीचा वापर होतो, त्यात प्रामुख्याने या रंगाचा समावेश केला जातो. पिवळे पदार्थ रेचक म्हणून काम करतात. तसंच पिवळ्या रंगामुळे शरीरातली विषद्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते

( Image : Google)

पाहूयात आहारात कोणत्या पिवळ्या पदार्थांचा समावेश करता येईल...

पिवळी फळे - केळी, आंबा, फणस, अननस, मोसंबी, खरबूज या फळांचा तुम्ही ऋतुनुसार आहारात समावेश करु शकता. आपल्याकडे केळी साधारणपणे वर्षभर उपलब्ध असतात. केळ्यामध्ये आरोग्यासाठी अतिशय उत्तम घटक असल्याने केळ्याचा समावेश सहज करु शकतो. याशिवाय इतर फळेही त्यांच्या उपलब्धतेनुसार आहारात असायला हवीत.

भाज्या - पिवळ्या भाज्यांमध्ये आपल्याकडे फारसे प्रकार उपलब्ध नसतात. पण लिंबू हा आहारातील एक महत्त्वाचा घटक पिवळ्या रंगाचा असतो. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते हे आपल्याला माहित आहे, त्यामुळे रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश करायला हवा. याशिवाय मका, भोपळा, पिवळ्या रंगाची सिमला मिरची या भाज्यांचा वापर आपण करु शकतो.  हळद - हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रक्त शुद्ध होऊन त्वचेचा रंगही उजळतो. हृदयविकार, मधुमेह, मेंदूचे विकार यांचा प्रतिबंध करण्यास हळद उपयुक्त ठरते. हळद ही जंतुनाशक म्हणूनही वापरली जाते. तसेच हळदीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेल्या कुरकुमिन या घटकामुळे हळदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रमाण १ ते १२ टक्क्यांपर्यंत असते. लहान मुलांसाठीही हळद अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. पदार्थाला रंग येण्यासाठीही हळद उपयुक्त ठरते. इतकेच नाही तर अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. 

( Image : Google)

डाळी - भारतीय आहार हा पोषक आहार म्हटला जातो. यात भाजी आणि फळांबरोबरच धान्ये, कडधान्ये, डाळी अशा सर्वांचा समावेश असतो. डाळी हा आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने शरीराला प्रथिन मिळण्यासाठी डाळींचा उपयोग होतो. शाकाहारी लोकांना आहारात इतर घटकांबरोबरच डाळींचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक असते. आपल्याकडे प्रामुख्याने तूर डाळ, मूग डाळ, हरबरा डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ खाल्ली जाते. तूरडाळीत फॉलिक अ‍ॅसिड, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कोलिन हे घटक असतात. मूग डाळ पचायला हलकी असल्याने लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना प्रामुख्याने ही डाळ दिली जाते. या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अ‍ॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली. मसूर डाळ कमी खाल्ली जात असली तरी वजन कमी करण्यास ही डाळ उपयुक्त ठरते. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. हरबरा डाळ किंवा डाळीचे पीठ आपल्याकडील अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. या डाळीत ‘सी’ व ‘के’ व्हिटॅमिन आणि जस्त असते. हे घटकही शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. उडीद डाळ पचायला जड, पण पौष्टिक असते. या डाळीतही पोटॅशियम चांगले आहे. ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जस्त आणि तांबेही उडीद डाळीतून मिळते.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स