आजकाल बरेच लोक विकतचं दही आणून खातात. याच एकमेव कारण म्हणजे कितीही केलं तरी घरचं दही काही चांगलं लागत नाही आणि त्याला काही विकतच्या घट्ट दह्याची सर येत नाही. विकतचं दही खरोखरच खूप घट्ट असतं. अक्षरश: दह्याचे काप करून ते काढावं लागतं. चवीलादेखील ते खूप आंबट नसतं. त्यामुळे खाण्यास अत्यंत रुचकर लागतं. पण थोडा प्रयत्न केला आणि दही लावताना काही चुका टाळल्या, तर घरचं दही देखील अतिशय घट्ट आणि चवदार होऊ शकतं.
दही लावण्याच्या पद्धती
प्रत्येक प्रांतानुसार दही लावण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. यापैकी कोणतीही पद्धत वापरून दही बनविले तरी ते चवदार आणि घट्टच होते. या सर्व पद्धतींमध्ये विशेष काही फरक नाही. त्यामुळे यापैकी तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटेल, ती निवडा आणि त्यानुसार दही लावून पहा.
१. या पद्धतीने दही लावायचे असल्यास सगळ्यात आधी अर्धा लिटर दूध घ्या. दूध तापवून उकळा आणि मग ते कोमट होऊ द्या. या कोमट दूधात टाकण्यासाठी एक टेबलस्पून किंवा त्यापेक्षाही कमी विरजन घ्या. हे विरजन व्यवस्थित हलवून एकसारखं करून घ्या. आता विरजन दुधाच्या भांड्यात टाका आणि व्यवस्थित ढवळून घ्या. जवळपास १ मिनिटे दूध चांगल्या पद्धतीने हलवून घ्या. आता हे दूध दुसऱ्या एका स्वच्छ स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात ओता आणि ७ ते ८ तास झाकूण ठेवा. यानंतर मस्त घट्ट, खापाचं दही तयार झालेलं असेल.
२. अर्धा लिटर दूध तापवून उकळवून घ्या. ते कोमट होऊ द्या. दोन टेबलस्पून विरजन घ्या. यामध्ये एक टेबलस्पून साखर टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकसारखं करून घ्या. साखर विरजनामध्ये चांगल्या पद्धतीने विरघळून जाईपर्यंत हे मिश्रण हलवा. आता हे दही आणि साखरेचं मिश्रण दुधाच्या भांड्यात टाका आणि व्यवस्थित ढवळून घ्या. जवळपास १ मिनिटे दूध चांगल्या पद्धतीने हलवून घ्या. आता हे दूध दुसऱ्या भांड्यात ओता आणि ७ ते ८ तास झाकूण ठेवा. घट्ट दही तयार होईल.
अवघ्या दोन तासांत बनवा झटपट दही
कधीकधी खूपच काहीतरी तातडीचं काम असतं आणि अशावेळी घरात नेमकं दही नसतं. असं काही अर्जंट असेल तर अवघ्या दोन तासात तुम्हाला झटपट दही लावता येईल. यासाठी अर्धा लिटर दूध घ्या. ते उकळवून कोमट करून घ्या. या दुधात आता तुरटीचा एक खडा टाका आणि तो एखादा मिनिट दुधामध्ये ढवळून घ्या. यानंतर तुरटी दूधातून काढून टाका. या दुधात आता दोन टेबलस्पून विरजन टाका आणि व्यवस्थित ढवळून घ्या. आता हे दूध दुसऱ्या एका पातेल्यात ओता. एका कुकरमध्ये पाणी टाकून त्याला थोडं तापवून घ्या. या कुकरमध्ये आपलं दुध ओतलेलं भांडं ठेवा. कुकरचं झाकण लावून टाका आणि ते २ तास उन्हात ठेवा. तुमचं इन्स्टंट घट्ट दही झालं तयार..
सौजन्य मधुराज रेसिपी
दही लावताना या काही चुका टाळा
- घट्ट दही बनविण्यासाठी टोन्ड दुधाचा किंवा साय काढलेल्या दुधाचा वापर करा.
- निरस्या दुधाचं म्हणजेच दूध न तापवता त्या दुधाचं दही लावू नका.
- उकळलेलं दूध कोमट झाल्यावरच त्यात विरजन टाका.
- खूप गरम आणि थंड दुधात विरजन टाकू नका.
- दूध गरम करण्यासाठी वापरलेल्या भांड्यात दही लावू नका.
- उन्हाळा असेल तर अगदीच अर्धा टेबलस्पून दही टाकून विरजन लावा.
- दूधात घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या.
- दही सेट करायला ठेवल्यावर ते भांडे वारंवार हलवू नका. शक्यतो या भांड्याला धक्का लागणारच नाही, अशा ठिकाणी ते ठेवा.
- दही सेट करायला जे भांडे ठेवले असेल, त्याच्यावर आधी वर्तमानपत्राच्या कागदाची जाडसर घडी घालून ठेवा आणि त्यानंतर झाकण लावा. कागद दह्यातील आर्द्रता शोषूण घेईल आणि दही अधिक घट्ट होईल.