Join us  

महागडी मलई बर्फी खाऊन समाधान मिळत नाही..घ्या घरच्याघरी उत्कृष्ट मलई बर्फी करण्याची सोपी रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 7:35 PM

उत्कृष्ट चवीची मलई बर्फी घरी करणं एकदम सोपं. घरी होणाऱ्या नेहमीच्य मिठायांना मलई बर्फी उत्तम पर्याय

ठळक मुद्देमलई बर्फी घरी करणं हे वेळखाऊ आणि कष्टाचं काम नाही. मलई बर्फी तयार करण्यासाठी ताजं पनीर आणि खवा यांची गरज असते. 

सर्व मिठायांमध्ये मलई बर्फीची चव एकदम खास असते. मलई बर्फी बनवणं मोठं वेळखाऊ आणि कष्टाचं काम वाटतं अनेकांना. पण उत्कृष्ट चवीची मलई बर्फी घरी करणं एकदम सोपं.  घरी होणाऱ्या नेहमीच्य मिठायांना मलई बर्फी उत्तम पर्याय आहे. 

Image: Google

घरच्याघरी मलई बर्फी कशी करणार?

मलई बर्फी तयार करण्यासाठी 250 ग्रॅम पनीर , 200 ग्रॅम खवा, अर्धा कप दूध, अर्धा कप साय, 1 कप साखर, 1 चमचा वेलची पूड, 2 चमचे सुका मेवा आणि 1 चमचा साजूक तूप घ्यावं. 

Image: Google

मलई बर्फी तयार करताना आधी पनीर आणि खवा घ्यावा. पनीर आणि खवा दोन्ही किसून घ्यावं. दोन्ही एकत्र करुन घ्यावं. पनीर आणि खव्याच्या मिश्रणात दूध आणि साय घालावी. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं.  कढईत तूप गरम करावं. तूप गरम झालं की त्यात पनीर खव्याचं मिश्रण घालावं. गॅसची आच मध्यम ठेवावी. मिश्रण सतत उलथण्यानं परतत राहावं.

 मिश्रण चांगलं एकजीव झालं , यातलं दूध आटू लागलं की त्यात एक कप साखर घालावी. साखर घातल्यावर मिश्रण पुन्हा नीट मिसळून परतून घ्यावं. साखर विरघळून मिश्रणातलं पाणी आटू लागलं की त्यात वेलची पावडर घालावी आणि मिश्रण पुन्हा परतून एकजीव करावं. गॅस  बंद करावा. मिश्रण थोडा वेळ गार होवू द्यावं. ताटाला थोडं तूप लावावं. मिश्रण कोमट झालं की ते ताटात टाकावं. चमच्यानं किंवा हातानं ते हलकं थापून घ्यावं. मिश्रण थापून झाल्यावर वरुन थोडा बारीक केलेला सुकामेवा भुरभुरुन टाकावा.  मिश्रण जसं गार होईल तसं ते चांगलं सेट होईल. मिश्रण पूर्ण सेट झालं की सुरीनं मिश्रणाचे चौकोनी काप करावेत. घरच्याघरी उत्कृष्ट चवीची मलई बर्फी करण्याची ही सोपी पध्दत आहे.  

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नपाककृती