Join us  

काय तर म्हणे बाहुबली पोहे! फळं घालून कधी कुणी पोहे करतं का, बघा हे अजबगजब पोहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2022 4:27 PM

पोह्यांचा अगडबंब प्रकार; नागपूरच्या चिरागनं फळांपासून सुक्यामेव्यापर्यत 36 गोष्टींचा वापर करत तयार केले बाहुबली पोहे..  

ठळक मुद्देनागपूरकरांना खूष करण्यासाठी चिराग आपल्या 'चिराग का चस्का' नावाच्या रेस्टाॅरण्टमध्ये नवनवीन प्रयोग करत नेहमीचे पदार्थ वेगळ्या रुपात आणि ढंगात तयार करत असतो.चिरागच्या रेस्टाॅरणटमध्ये 20 प्रकारचे पोहे मिळतात. पोह्यातला लेटेस्ट प्रकार म्हणजे 'बाहुबली पोहे'.200 रुपयांच्या प्लेटमध्ये 5 जण आरामशीर पोटभर खाऊ शकतील एवढे पोहे येतात. 

कितीही घाई असली तरी नाश्त्याला चटकन होणारा पदार्थ म्हणजे पोहे. साधा सुधा तरीही चविष्ट लागणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा. चवीची परीक्षा ते सुगरणीचा किताब या दोन्ही गोष्टी एकाच पदार्थातून साध्य होणाऱ्या. पोहे इतके सवयीचे की ते असणारच आहेत दिमतीला म्हणून त्यांना गृहीतच धरलेलं. अशा सवयींच्या पोह्याचं काय कौतुक? पण नागपूरच्या चिरागनं फळांपासून सुक्यामेव्यापर्यंत 36 गोष्टी टाकत पोहे तयार केले आणि या अजब गजब पोह्यांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. सध्या चिरागचे हे पोहे सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. नागपूरच्या एका फूड ब्लाॅगरनं चिरागनं तयार केलेल्या पोह्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. नागपूरकरांना खूष करण्यासाठी चिराग आपल्या 'चिराग का चस्का' नावाच्या रेस्टाॅरण्टमध्ये नवनवीन प्रयोग करत नेहमीचे पदार्थ वेगळ्या रुपात आणि ढंगात तयार करत असतो. चिरागच्या रेस्टाॅरणटमध्ये 20 प्रकारचे पोहे  मिळतात. पोह्यातला लेटेस्ट प्रकार म्हणजे 'बाहुबली पोहे'

200 रुपयांच्या प्लेटमध्ये 5 जण आरामशीर पोटभर खाऊ शकतील एवढे पोहे येतात. पोहे खाताना सर्व प्रकारच्या चवी आस्वादायला मिळाव्यात यासाठी चिरागनं भाज्या, फळं, सुकामेवा , नमकीन, फरसाण यांचा वापर केला आहे. चिरागचे हे बाहुबली पोहे तेलात नाही तर बटरमध्ये तयार होतात. नेहमीप्रमाणे त्याने पोहे निवडून धुवून भिजवून घेतले . एका कढईत त्याने बटरच्या वडीतला अर्धा बटर टाकला . तो पूर्ण विरघळायच्या आतच त्याने त्यात मिरच्या, कढीपत्ता , जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. फोडणीत त्याने बारीक चिरलेला कोबी, फ्लाॅवरची फुलं, सिमला मिरची, गाजर, हिरवे मटार टाकून ते परतून घेतले. नंतर यात थोडी काळी द्राक्षं, हिरवे द्राक्षं, संत्रं, सफरचंद, अननस, कैरी यांच्या बारीक फोडी करुन टाकल्या. फळानंतर त्याने त्यात थोडा सुकामेवा टाकला. सुकामेवा म्हणून  काजूचे तुकडे, अंजीरचे तुकडे, पिस्त्याचे काप घातले. फळं परतल्यानंतर त्याने थोडा उकडलेला मका घातला. मका फोडणीत मिसळल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ, हळद आणि कोथिंबीर घातली. फोडणीत नंतर भिजवलेले पोहे टाकले.

पोहे चांगले परतून घेतल्यानंतर त्याने एका सर्व्हिंग बाऊलमधे घातले. इथपर्यंत चिरागचं अर्धच काम झालेलं. निम्मं काम पोहे सर्व्हिंग बाऊलमध्ये टाकल्यावर केलं. पोहे सर्व्ह करताना त्याने एका वाटीत उसळ , एका वाटीत दही, एका वाटीतल् नागपूरी तर्री दिली तर कोणाला तिखट वगैरे लागल्यावर काहीतरी गोड असायला हवं म्हणून कलिंगडच्या फोडींची एक वाटी ठेवली. नंतर त्याने पुन्हा मोर्चा बाऊलमधील पोह्यांकडे वळवला. त्याने पोह्यांवर जाड शेव, सावजी चिवडा, नमकीन, बुंदी, बारीक शेव , फराळी चिवडा पेरला. नंतर  त्यावर बारीक चिरलेली कैरी आणि अननसाच्या फोडी घातल्या. पोह्यांवर चारी बाजूला पनीरचे तुकडे ठेवून पनीर किसूनही घातलं. डाळिंबाचे दाणे पेरुन पोह्यांवर लिंबाचे गोल काप ठेवले. वरुन चिरलेली कोथिंबीर पेरुन थोडा सुकामेवाही घातला. पोह्यांवर थोडं बटर ठेवल. या बाहुबली पोह्यांची शान वाढवण्यसाठी त्याने पोह्यात गुलाबाचं फुल खोचलं.

चिरागच्या या बाहुबली पोह्यांचा व्हिडीओ पाहून अनेकांनी  पोह्यांचं भव्य दिव्य रुप पाहाता पोह्यांची किंमत 200 नाही तर 500 ठेवावी असं म्हटलं. तर काहींना साध्य सुध्या पोह्यांचं विशाल रुप काही आवडलं नाही. साधे सुधे, चटकन होणारे पोहे खाणाऱ्यांनी पोह्यांच्या या विशाल रुपाला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. चिरागचे बाहुबली पोहे पाहून अनेकांनी तोंडाला पाणी सुटल्याचं म्हटलं तर अनेकांनी खास चिरागचे बाहुबली पोहे खाण्यासाठी नागपूरला जाण्याचा निश्चय केला. चिरागचे हे बाहुबली पोहे पाहून थक्क व्हा याच स्वरुपातले नसून ठरवलं तर एखाद्या दिवशी भरपूर वेळ काढून हा प्रयोग आपण घरी बसूनही करु शकतो. हाताशी बाहुबली पोह्यांचा व्हिडीओ आहेच!

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न