काकडीचा उपयोग करून आपल्याला हा रायता बनवायचा आहे. हा रायता म्हणजे उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांतात राहणाऱ्या लोकांची स्पेशल डिश आहे. हे रायते बनविताना काकडी ऐवजी खिरा वापरला तरी चालतो. कोशिंबीर किंवा रायते हा प्रकार म्हणजे जेवणाची चव बॅलेन्स करणारे पदार्थ. हे पदार्थ ताटात असले, की ताटाची शोभा तर वाढतेच पण जेवणाराही तृप्त होऊन जातो.
हे रायते उत्तराखंडची स्पेशालिटी असले तरी रायत्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील सर्व स्वयंपाक घरांमध्ये अगदी सहजतेने उपलब्ध असतील अशाच आहेत. त्यामुळे हे रायते बनविण्यासाठी कोणतीही विशेष तयारी करण्याची गरज नाही. सगळी सामग्री असेल तर अवघ्या ५ ते १० मिनिटात ही मस्त डीश झटपट तयार होऊ शकते.
उत्तराखंडच्या स्पेशल रायत्याची रेसिपी१. यासाठी आपल्याला काकडी, दही, कोथिंबीर, तेल, मीठ, साखर, चाट मसाला, काळे मीठ आणि एखादी वाळलेली लाल मिरची एवढे साहित्य लागणार आहे.२. सगळ्यात आधी तर काकडीची साले काढून घ्या आणि ती अगदी बारीक चिरून घ्या. काकडी किसून घेणे टाळावे. कारण हे रायते बनविताना आपण त्यात दही टाकत असल्यामुळे ते खूपच पाणीदार होऊ शकते. म्हणून काकडी कांदा चिरतो त्याप्रमाणे बारीक कापून घ्यावी.
३. रायत्यासाठी वापरण्यात येणारे दही घट्ट आणि चांगले फेटलेले असावे. पातळ, पाणीदार दही रायते बनविण्यासाठी वापरू नये.४. चिरलेल्या काकडीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, चिमुटभर काळे मीठ, चिमूटभर साखर आणि आवडीनुसार मीठ टाकावे. यानंतर यातच फेटलेले दही टाकावे आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे.५. सगळ्यात शेवटी वाळलेली लाल मिरची, मोहरी, जीरे आणि हिंग टाकून केलेली फोडणी रायत्यामध्ये टाकावी. जेवणासाठी कोणताही बेत केला असेल, तरी त्यासोबत हे रायते सहज चालून जाते.