आपल्याकडे गॅलरी, खिडकीचं ग्रील, दारात लहानसं होम गार्डन असेल तर त्यात काही रोपं आवर्जून असतात. आपण या रोपांना नियमित पाणी घालतो. त्यांना हवा-उजेड मिळेल असे पाहतो, पण त्याहून जास्त त्यांची मशागत करायला आपल्याला जमतेच असे नाही. आपल्या गार्डनमध्ये साधारणपणे तुळस, जास्वंद, शेवंती, मोगरा, सदाफुली यासोबत आणखी एक रोप असतंच ते म्हणजे गुलाबाचं. यामध्ये गावठी गुलाब, बटण गुलाब, चिनी गुलाब असे बरेच प्रकार असतात. रोप नवीन आणल्यावर या रोपाला मस्त भरपूर फुलं येतात. ही रंगबिरंगी फुलं फुललेली पाहून आपल्याला छान वाटतं (1 Simple trick to Take Care Of Rose Plant and for blooming Flowers gardening Tips).
पण नंतर मात्र नुसत्याच फांद्या वाढतात आणि रोपाला पालवी फुटणं, फुलं येणं बंद होतं. मग आपण रोपाचं कटींग करतो, त्याला खत घालतो तरीही फुलं येत नाहीत. गुलाब फुललेला असेल तर त्याची फुलं मनाला सुखावून जाणारी असतात. आपला मूड थोडा डाऊन असेल, निराश असू तर या रोपांकडे पाहून आपल्याला काही काळासाठी का होईना छान वाटतं. पण एकाएकी फुलं येणं बंद झाल्याने आपणही थोडे हिरमुसतो आणि फुलं येण्यासाठी नेमकं काय करावं आपल्याला कळत नाही. पाहूयात गुलाबाला फुलं येण्यासाठी १ सोपा उपाय कोणता...
गुलाबाला फुलं येण्यासाठी करा फक्त १ गोष्ट..
आपण रोपांना नियमितपणे खतं घालतो. यामध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत अशी बाजारात विकत मिळणारी खतं असतात. पण आज आपण घरच्या घरी करता येईल असा १ सोपा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे फुलं न येणारा गुलाब मस्त बहरण्यास मदत होईल. यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा अतिशय चांगला उपयोग होतो. गुलाबाच्या कुंडीतील मातीमध्ये याचे काही दाणे घालायचे आणि ते मातीत चांगले मिसळावेत यासाठी वरुन पाणी घालायचे. यामुळे रोपाला पालवी फुटायला आणि त्याठिकाणी कळ्या यायला मदत होते. महिन्यातून फक्त एकदा १० ते १५ दाणे रोपामध्ये घातल्यास गुलाबाला मस्त बहर येतो.