आपल्या प्रत्येकाच्या घरात एक छोटीशी बाग असतेच. कधी ही बाग आपल्या गॅलरीत असते तर कधी खिडकीच्या ग्रीलमध्ये. अगदी ४-५ का होईनात ही रोपं आपल्या घराला शोभा आणतात खरी. आजकाल इनडोअर प्लांटसची पण बरीच फॅशन आल्याने घर सजवण्यासाठीही रोपांचा छान उपयोग केला जातो. या रोपांना आपण नियमित पाणी घालतो. कधीतरी ती उकरुन साफ करतो आणि खतही घालतो. इतकंच काय पण वेळ होईल तशी त्याची छाटणीही करतो. मात्र तरीही ही रोपं सुकून जातात. अनेकदा हे सुकणे केवळ पानांपुरतेच मर्यादित असते. देठं हिरवीगार आणि पानं मात्र पिवळी पडलेली अशी ही रोपं पाहून आपल्याला कसंतरीच होतं. आपण ज्यांची प्रेमाने काळजी घेतो ती रोपं अशी हिरमुसलेली पाहून नेमके काय करावे ते कळत नाही. मात्र देठ, पानं दोन्ही छान हिरवीगार दिसावीत आणि रोपांना भरपूर फुलं यावीत यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया (3 Easy gardening Tips for green and growing plants at home)...
१. उन्हाचा तडाखा बघा
आपण रोपं अनेकदा आपल्या सोयीनुसार ठेवतो. पण त्याठिकाणी रोपांना किती ऊन लागतं हेही बारकाईने पाहायला हवं. काहीवेळा रोपांना प्रमाणापेक्षा जास्त ऊन लागल्याने ती जळाल्यासारखी होतात आणि मग पानं सुकतात. तर काहीवेळा अजिबात सूर्यप्रकाश न मिळाल्यानेही रोपं सुकू शकतात. त्यामुळे रोपांना योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश मिळतो की नाही याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
२. पाण्याची आवश्यकता लक्षात घ्या
आपण एक काम म्हणून रोपांना पाणी घालतो. पण हे पाणी रोपांना योग्य पद्धतीने पोहचत नसेल तर ती सुकण्याची शक्यता असते. पाणी कमी पडत असेल तरी ते वरपर्यंत पोहोचत नाही आणि पानं सुकून गळून पडतात. तसेच कुंडीचे होल मोठे असेल तर त्यातून पाणी गळून जाते आणि ते रोपांना नीट मिळतच नाही. याशिवाय पाणी जास्त झाले तरीही कुंडीत नुसताच चिखल होऊन राहतो. त्यामुळे रोपांना आवश्यकतेनुसार पाणी घालायला हवे.
३. कापणी महत्त्वाची
रोपांचे योग्य वेळी योग्य पद्धतीने कटींग केले तर सुकलेली देठं आणि पाने रोपावर राहत नाहीत. काही रोपांना फुलं येऊन गेली आणि ही रोपं प्रमाणापेक्षा जास्त वाढली की त्याठिकाणचा भाग रुक्ष व्हायला लागतो. अशावेळी त्याठिकाणी फुलं येऊन गेली असतील आणि पुढे पालवी फुटण्याची शक्यता नाही असे वाटत असेल तर त्याठिकाणी रोप कापायला हवे. फांद्या वेळच्या वेळी नीट कापल्यास रोप मस्त फुलते आणि नेहमी छान हिरवेगार राहते.