आपण घरातल्या बागेत फार कसले नाही पण तुळशीसोबत एखादे गुलाब, मोगरा, जास्वंद असे रोप लावतोच. यामुळे गॅलरी किंवा खिडकीच्या ग्रिलला थोडी शोभा येते. रोजच्या धावपळीत झाडाला पाणी घालताना अचानक गुलाबाला फूल आलेले पाहून आपण मनोमन खूशही होतो. आपण या रोपांना नियमित पाणी घालतो, कधीतरी खत घालतो. या रोपांना चांगला हवा-उजेड मिळेल असे पाहतो. ही रोपंही छान आपल्याच तालात डोलत असतात. गुलाबाच्या रोपावर आलेलं फूल मस्त खुलून दिसतं. यामध्येही आपल्याकडे साधारण गुलाबी, लाल या रंगांच्या वेगवेगळ्या शेडस असतात. बटण गुलाब, गावठी गुलाब किंवा आणखीही काही जाती असतात (3 easy home remedies for white bugs powdery mildew on rose plants).
गुलाबाच्या रोपाला येणारी फुलं अचानक येईनाशी होतात आणि रोपावर बुरशी पडायला लागते. अशावेळी चुकून फूल आलंच तर त्यावरही पांढऱ्या रंगाची किड किंवा बुरशी दिसते. यामुळे रोपाची वाढ तर खुंटतेच पण संपूर्ण रोपच खराब होऊन जाण्याची शक्यता असते. रोपाला पुरेसं ऊन मिळालं नाही तर अशाप्रकारे बुरशी पडते. काहीवेळा ही बुरशी आजुबाजूच्या झाडांवरही पसते. असे होऊ नये आणि गुलाबाचे रोप छान हिरवेगार राहावे आणि त्याला भरपूर फुलं यावीत यासाठी काही सोपे उपाय करायला हवेत. पाहूयात हे उपाय कोणते आणि त्यामुळे किड जाण्यास कशाप्रकारे मदत होते.
१. कटींग करा
रोपाला ज्याठिकाणी किड लागली आहे त्याठिकाणी रोपाचे कटींग करायला हवे. जेणेकरुन ही कीड पसरणार नाही आणि रोप वाचू शकते. कटींग करतानाही गुलाबाला काटे असल्याने योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित पद्धतीने कटींग करायला हवे. काहीवेळा किड किंवा रोग आधीच जास्त पसरलेला असतो तरीही नीट कटींग करुन रोप वाचवता येऊ शकते. एखादी फांदी चांगली असेल तर ती तशीच ठेवून बाजूच्या फांद्या कापून टाकायच्या.
२. हळद, डाळ-तांदळाचे पाणी
जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून हळद अतिशय उपयुक्त असते हे आपल्याला माहित आहे. आपणही एखादी जखम झाली की त्याठिकाणी पटकन हळद लावतो. त्याचप्रमाणे रोपांची किड जाण्यासाठी हळद उपयुक्त ठरते. रोपांवर झालेला जंतूसंसर्ग त्यामुळे कमी होतो. यासाठी १ लीटर पाण्यात १ ते २ चमचे हळद घालून ती चांगली मिसळून घ्यायची. त्यानंतर हे पाणी रोपांवर किड आलेल्या ठिकाणी मारायचे. डाळ तांदूळ धुतल्यावर त्याचे पाणी आपण टाकून देतो. पण तसे न करता हे पाणी गुलाबाच्या रोपाला घालावे, त्यामुळे रोपाला पोषण मिळते आणि ते छान बहरण्यास मदत होते.
३. उन्हात ठेवा
काहीवेळा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये पुरेसं ऊन येत नाही. त्यामुळे याठिकाणी ओलावा किंवा दमट हवा राहते. यामुळेही रोपांवर किड येऊ शकते. अशावेळी गुलाबाच्या रोपाची जागा बदलून पाहायला हवी. त्यामुळे रोपाला पुरेसं ऊन मिळतं आणि त्यावरचा रोग कमी होण्याची शक्यता असते. ऊन्हामुळे रोग निघून जाण्यास मदत होते.