Join us  

थंडीत कुंडीतल्या रोपांना भरभरुन फुलं येण्यासाठी बेकींग सोडाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त-हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2023 2:54 PM

3 effective remedies of baking Soda for plant : स्वयंपाकात, साफसफाईच्या कामांमध्ये वापरला जाणारा बेकींग सोडा हा रोपांना संजीवनी देणारा ठरतो.

आपण घराच्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये तरी आवर्जून छोटीशी बाग फुलवतो. यामध्ये फुलांची, शोभेची आणि इनडोअर अशी कितीतरी रोपं असतात. घरात प्रसन्न वाटावे, ऑक्सिजन खेळता राहावा यासाठी आपण ही बाग फुलवतो खरी. पण या रोपांना छान रंगीत फुलं यावीत अशी आपली फार इच्छा असते. आपण बाजारातून रोप विकत आणतो तेव्हा त्यावर काही फुलं असतात. पण नंतर मात्र रोजच्या धावपळीत या रोपांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्याला फुलं येणं बंद होतं. मग कुंडीत नुसतीच पानं आणि फांद्या वाढत राहतात. काहीवेळा या रोपांकडे नीट लक्ष दिलं नाही तर या रोपांना किड किंवा मुंग्याही लागतात. पण असं होऊ नये यासाठी या रोपांची नियमित काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी कुंडीतील माती मोकळी करणे, त्यात खत घालणे, रोपांची कापणी करणे, त्यांना नीट हवा-उजेड मिळणे अशा ठिकाणी रोपं ठेवणे अशा काही गोष्टी नियमित करणे गरजेचे असते (3 effective remedies of baking Soda for plant).

 रोपांना सतत किड लागत असेल तर वेळच्या वेळी त्यांच्यावर किटकनाशके फवारणेही अतिशय गरजेचे असते. ज्यामुळे किड निघून जाण्यास मदत होते. पण किटकनाशके बाजारातून खरेदी करावी लागतात. तसेच काही वेळा या किटकनाशकांमध्ये रासायनिक घटक असल्याने अनेकांना त्यामुळे दम लागणे, शिंका येणे, सर्दी होणे असे अॅलर्जीशी निगडीत त्रासही होऊ शकतात.  अशावेळी स्वयंपाकात, साफसफाईच्या कामांमध्ये वापरला जाणारा बेकींग सोडा हा रोपांना संजीवनी देणारा ठरतो. बेकींग सोड्याचा वेगवेगळ्या पद्धतीने नीट वापर केला तर रोपं ताजीतवानी होण्यास आणि त्यांना भरपूर फुलं येण्यास मदत होते. पाहूयात हा बेकींग सोडा रोपांसाठी नेमका कसा वापरायचा. 

(Image : Google)

१. साधारण ४०० मिलीलीटर पाणी घेऊन त्यात १० ग्रॅम सोडा घालायचा. हे मिश्रण चांगले एकत्र केल्यावर स्प्रे बाटलीमध्ये भरुन ते रोपांवर सगळीकडे नीट मारायचे. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास रोपांची आणि फुलांची चांगली वाढ होण्यास मदत होते. 

२. ४५० मिलीलिटर पाणी घेऊन त्यात २० ग्रॅम बेकींग सोडा घालायचा. त्यामध्ये साधारण ३० ग्रॅम व्हिनेगर घालायचे. हे सगळे हवनून चांगले एकजीव करायचे आणि रोपांवर फवारायचे. यामुळे झाडाला लागणारी किड आणि मुंग्या झाडापाशी अजिबात फिरकत नाहीत. 

३. साधारण ३० ग्रॅम बेकींग सोडा आणि ३० ग्रॅम साखर घ्यायची. यात अंदाजे पाणी घालून साखर पूर्ण विरघळू द्यायची आणि हे मिश्रण काही वेळासाठी मुरत ठेवायचे. मग हे मिश्रण रोपांवर फवारल्यास पांढऱ्या रंगाची बुरशीसारखी किड जाण्यास याचा चांगला उपयोग होतो.  

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी