हवाबदल हा आपल्यासाठी जसा वेगळा असतो तसाच तो इतर सजीवांसाठीही असतो. त्यामुळे हवाबदल होताना डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. खेडेगावात तर झाडी, मोकळे रान असल्याने डास होतातच. पण शहरातही गर्दीच्या ठिकाणी डासांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. संध्याकाळच्या वेळी आपण चुकून गॅलरीचे दार, खिडक्या बंद करायला विसरलो की घरात डासांचा सुळसुळाट होतो. रात्री आपण बेडवर शांत पडलो की हे डास आपल्याला फोडून खायला सुरुवात करतात. मग कधी त्यांना मारण्यासाठी रॅकेट तर कधी आणखी काही उपाय वापरुन आपण त्यांना पळवून लावतो.एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात (3 Useful home plants which keeps mosquitoes away from home).
डास चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते, आग होते, लाल होते. हे डास साधे असतील तर ठिक नाहीतर डेंगी, चिकनगुन्या यांचे डास असतील तर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. डास हे केवळ साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही डासांचे प्रमाण वाढू शकते. यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने या डासांना पळवून लावण्यासाठी करता येईल असा उपाय म्हणजे घरात काही रोपं लावणे. या रोपांमुळे डास पळवून लावणे सोपे होते.
१. लवेंडर - लव्हेंडर हे झाड तुम्ही घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या आतही ठेवू शकता. खाली गवतासारखी असणारी पाने आणि वर जांभळ्या रंगाची आकर्षक फुले अतिशय सुंदर दिसतात. या झाडामुळे घरात अजिबात डास येत नाहीत. त्यामुळे तुम्ही झोपत असलेल्या बेडरुममध्ये हे झाड लावल्यास रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून तुमची सुटका होऊ शकते. ही झाडे सगळ्या ऋतूमध्ये सहज मिळत असल्याने आणि वाढत असल्याने ते आवर्जून घरात लावायला हवे. या फुलांचा वास डासांना घरात येण्यापासून दूर ठेवतो.
२. रोजमेरी - रोजमेरीचे रोप डासांना पळवून लावण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याच्या वासाने केवळ डासच नाही, तर माश्या आणि इतर किटकही निघून जाण्यास मदत होते. या फुलांचा वास उग्र असल्याने डास पळून जाण्यास मदत होते. या वासाचे ऑल आऊट आणि उदबत्तीही बाजारात मिळते. हे रोप आपण आपल्या होम गार्डनमध्ये ठेवले तरी चालते, याठिकाणी ते छान वाढते. पण अशी जागा नसेल तर आपण घरातही हे रोप वाढवू शकतो.
३. पुदीना - ही औषधी वनस्पती असून विविध औषधांमध्ये आणि स्वयंपाकातील पदार्थांतही पुदीन्याचा उपयोग होतो. या वनस्पतीला उग्र वास असल्याने डास लांब राहण्यास मदत होते. पुदीना घरातील कुंडीतही अगदी सहज वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही डासांना दूर ठेवण्यासाठी हे रोप घरात आवर्जून लावायला हवे. पुदीन्याला ऊन लागत असल्याने घरात ज्याठिकाणी ऊन येईल अशा जागी हे रोप ठेवायला हवे.