घर सजवण्यासाठी हल्ली घरांमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर प्लांटस आवर्जून लावली जातात. घराच्या बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये, दारात छान फुलांची, शोभेची रोपं लावली की घराला एक वेगळाच छान लूक येतो. ही रोपं मस्त फुललेली असतील तर छान दिसतात पण ती कोमेजलेली,सुकलेली असतील तर मात्र या होम गार्डनची मजाच जाते. पुरेसे पोषण न मिळाल्याने, ऊन-वारा न मिळाल्याने किंवा कधी किड लागल्याने ही रोपं कोमेजतात. रोपं कायम सदाबहार राहावीत यासाठी आपण बाजारात मिळणारी खतं आणि किटकनाशकं वापरतो.
पण त्यापेक्षा घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होण्यास मदत होते. बेकींग सोडा हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट. स्वयंपाकात आणि स्वच्छतेच्या कामासाठी वापरला जाणारा हा सोडा रोपांना छान बहर येण्यासाठीही फायदेशीर असतो. पण या सोड्याचा वापर नेमका कसा करायचा ते माहित असायला हवे. पाहूयात सोड्याचा ३ प्रकारे केलेला वापर बाग हिरवीगार होण्यासाठी कसा उपयोग होतो.
१. साधारण १० ग्रॅम बेकींग सोड्यामध्ये ४०० मिलीलीटर पाणी घालायचे. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरायचे आणि रोपांवर सगळीकडे छान फवारायचे. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास रोपांची वाढ खुंटली असेल तर पानं हिरवीगार होतात आणि रोपं वेगाने वाढण्यास मदत होते.
२. साधारण २० ग्रॅम बेकींग सोडा आणि ३५० मिलीलीटर पाणी एकत्र करायचे. यामध्ये ३० ग्रॅम व्हाईट व्हिनेगर घालायचे. हे मिश्रण चांगले एकत्र करुन स्प्रे बाटलीने रोपांवर फवारायचे. रोपांना येणारी किड लागते ती जाण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो.
३. ३० ग्रॅम बेकींग सोडा, ३५० मिलीलीटर पाणी आणि ३० ग्रॅम साखर एकत्र करायचे. रोपांवर पांढरी किंवा पावडरप्रमाणे जी किड लागते ती जाण्यास याचा चांगला उपयोग होतो. अशाप्रकारची किड घालवण्यासाठी रासायनिक घटक वापरण्यापेक्षा या नैसर्गिक पदार्थांचा चांगला फायदा होतो.