Join us  

घरात सतत पाली येतात? पालींचा सुळसुळाट कमी करण्यासाठी लावा ४ रोपं, दिसेल फरक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 9:34 AM

4 plants to keep lizards away from home : पालींचा वावर वाढला तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसते

उन्हाळा सुरू झाला की घराच्या भिंतींवर, खिडक्यांवर पाली दिसायला लागतात. पाण्याच्या ठिकाणी गार वाटत असल्याने सिंक, बाथरुम, टॉयलेट यासारख्या ठिकाणी तर उन्हाळ्यात आवर्जून पाली दिसतात. एक पाल आली की काही दिवसांत तिची पिल्लंही दिसायला लागतात. या पालींचा सुळसुळाट अनेकदा नकोसा होतो. पाल पाहिली तरी बऱ्याच जणांना तिची किळस आणि भिती वाटते. एकदा ही पाल घरात आली की ती काही केल्या बाहेर जायचं नाव घेत नाही आणि मग आपण ती कुठे आहे पाहत घाबरत राहतो (4 plants to keep lizards away from home). 

रात्रीच्या वेळी तर या पाली जमिनीवरुनही फिरतात आणि घरभर त्यांची विष्ठा दिसायला लागते. तसेच पालींचा वावर वाढला तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसते. त्यामुळे या पालींना घराबाहेर काढण्यासाठी आपण कधी घरगुती उपाय करतो तर कधी बाजारातून काही औषधं आणून मारतो. मात्र तरीही या पाली घराबाहेर जातातच असं नाही. आज आपण पाली घरातून निघून जाण्यासाठी घरात कोणती रोपं लावायला हवीत याबद्दल जाणून घेणार आहोत. 

(Image : Google)

१. गवती चहा

गवती चहा हा चहामध्ये घालण्याचा एक महत्त्वाचा घटक. गवती चहामुळे चहाला एकप्रकारची मस्त चव येते. गवतासारखा दिसणारा हा गवती चहा वाढतोही भराभर. याचा वास आंबट असल्याने या वासाने पाली दूर पळण्यास मदत होते. गवती चहामध्ये असणारे सिट्रोनिला हे रसायन घरातील किटक मारण्याच्या विविध प्रकारच्या स्प्रेमध्ये वापरलेले असते. 

२. झेंडू

झेंडूच्या फुलात असणारे पाइरेथ्रिन आणि ट्रेपीज नावाच्या रसायनांचा वास आल्याने पाल आजारी पडते. या वासामुळे पाली दूर पळून जाण्यास मदत होते. त्यामुळे घरात पाली असतील तर आवर्जून झेंडूचे रोप लावायला हवे. 

३. पुदीना

स्वयंपाकघरात पदार्थांना चव येण्यासाठी आवर्जून पुदीना वापरला जातो. पुदीन्यामध्ये असलेला मेंथॉल नावाच्या घटकाला एकप्रकारचा उग्र वास असतो. हा उग्र वास पालींना सहन होत नसल्याने त्या निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)

४. लवेंडर 

या रोपामध्ये लिनालूल आणि मोनोटरपेंससारखी रसायने असतात. ते एकप्रकारचे इंसेक्टीसाइड असते.  त्यामुळे पाली घराबाहेर पडण्याचा रस्ता शोधते आणि निघून जाते.  

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स