होम गार्डनमध्ये असलेली रोपं छान फुललेली, हिरवीगार असतील तर आपल्याला बरं वाटतं. पण ही रोपं काही कारणाने सुकून गेली असतील, त्यांना फुलं येत नसतील तर मात्र काय करावे ते आपल्याला कळत नाही. कधी जास्वंदाचे रोप नुसतेच वाढते पण त्याला फुलंच येत नाहीत. तर काही वेळा या रोपाला पांढऱ्या रंगाची किड पडते आणि रोपाची वाढ खुंटते. जास्वंदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, रंगांची रंगबिरंगी फुलं असतात. ही फुलं आली की रोप पाहायला अतिशय सुंदर दिसते. पण खूप दिवस फुलं आली नाहीत की मात्र आपला मूडच जातो. असे होऊ नये आणि जास्वंद चांगला बहरावा यासाठी या रोपाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विकेंडला आपण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास हे रोप फुलण्यास मदत होते (4 Tips to get Good Flowering in Hibiscus Plant).
१. जास्वंदाचे रोप किमान ४ ते ५ तास उन्हात राहील असे पाहा. या रोपाला चांगले ऊन लागल्यास त्याची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत होईल. हा उपाय आपण नक्कीच करु शकतो.
२. रोपांना पाणी घालण्याची पद्धत असते. पाणी घातल्यानंतर ते रोपामध्ये योग्य पद्धतीने मुरायला हवे. पाणी पूर्ण रोपाच्या मुळापर्यंत गेले आणि माती काही वेळात कोरडी झाली तर रोपाला योग्य पद्धतीने पाणी मिळाले असे समजा.
३. रोपांची वेळच्या वेळी छाटणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. छाटणी केल्याने रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते. जिथे फुलं येऊन गेली आहेत त्याठिकाणी छाटणी केल्यास नवीन पालवी फुटण्यास मदत होते. जास्वंदाच्या रोपाची छाटणी करण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हा सर्वात चांगला कालावधी असतो. छाटणीमुळे रोपाला चांगला बहर येण्यास मदत होते.
४. दर १५ दिवसांनी जास्वंदाच्या रोपावर कडुनिंबाचे तेल फवारायला हवे. यामध्ये थोडे गोडे तेल मिसळून स्प्रे बाटलीने ते रोपांवर फवारायला हवे. रोपांना लागणारी पांढऱ्या रंगाची किड किंवा इतरही कीड जाण्यास याची चांगली मदत होते.