आपल्या घरात बाग, छोटसं होम गार्डन नसलं तरी एक रोप आवर्जून असतं ते म्हणजे तुळस. दारात,खिडकीत किंवा गॅलरीत तुळशीचं रोप आवर्जून लावलं जातं. धार्मिक महत्त्व असलेली ही तुळस बहरणं चांगलं लक्षण मानलं जातं. तुळशीची इतर रोपांप्रमाणे खूप काळजी घेण्याची आवश्यकता नसते. रोजच्या रोज पाणी घातलं की ती छान वाढते. हे जरी खरं असलं तरी काहीवेळा उन्हामुळे किंवा अन्य काही कारणांनी तुळस वाळण्याची शक्यता असते. एकदा ही तुळस वाळायला लागली की तिला पुन्हा बहर यायला वेळ लागतो. तुळशीच्या फांद्या आणि पाने ऊन्हाने किंवा अन्य काही कारणांनी सुकून गेल्यावर ती छान फुलून येण्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते. तुळशीची पाने वाळून किंवा गळून गेली की नुसत्या फांद्या म्हणजेच काड्या दिसायला लागतात. पण असे होऊ नये आणि तुळशीचा बहर कायम राहावा यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया (4 Tips to take care of tulsi basil plant) ...
१. तुळशीला प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले तर ती खराब होण्याची आणि सुकून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले तरी चालते.
२. तुळशीची पाने आणि मंजिरी उन्हामुळे गळून पडत असतील आणि नुसत्याच फांद्या राहील्या असतील तर या फांद्या वेळच्या वेळी कापायला हव्यात. कापणी केल्याने नवीन पालवी फुटायला आणि रोपाची चांगली वाढ होण्यास मदत होते.
३. हळद ही आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. हळदीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीइन्फ्लमेटरी गुणधर्म तुळशीचे रोप वाढण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुळशीच्या मुळाशी मातीत हळद घालावी.
४. चुना हाही खनिजांनी युक्त असा घटक आहे. चुन्याची पूड तुळशीच्या रोपाला घातल्यास त्याचा रोपाला बहर येण्यास फायदा होतो. या उपायांनी अवघ्या १५ दिवसांत वाळलेली तुळस हिरवीगार होण्यास मदत होते.