आपल्या होम गार्डनमधली रोपं मस्त हिरवीगार आणि छान बहरलेली असावीत असं आपल्याला कायम वाटतं. अनेकदा ती तशी असतातही. पण काही वेळा मात्र या गार्डनकडे थोडं दुर्लक्ष झालं की ही रोपं सुकून जातात. काहीवेळा रोपांची पानं सुकतात आणि गळतात, रोपांना कीड लागते किंवा रोप नुसतंच वाढतं आणि त्याचा हिरवेपणा कमी होतो. इतकंच नाही तर एकाएकी रोपांना फुलं येणंच बंद होतं. अशावेळी आपली बाग कोमेजल्यासारखी किंवा हिरमुसल्यासारखी वाटते. आपण मनापासून जपलेली वाढवलेली बाग छान हिरव्यागार फुलांनी बहरलेली असेल तर छान वाटते (4 types of water to grow home garden fast and beautiful).
आपण रोपांची काळजी घेतो म्हणजे त्यांना नियमितपणे पाणी घालतो. इतकेच नाही तर विकेंडला आपण रोपांचा छाटणी करणे, त्यांना खत घालणे, किटकनाशके फवारणे असे काही ना काही करतो. पण रोज रोपांना साधे पाणी घालण्यापेक्षा त्या पाण्यात काही खास गोष्टी घातल्यास रोपांचा पोषण होण्यास मदत होते. आपले जसे चांगले अन्न खाल्ल्याने पोषण होते त्याचप्रमाणे रोपांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. पाहूयात यासाठी झाडांना द्यायच्या पाण्यात नेमकं काय घालायचं...
१. सोयाबिन
सोयाबिन आपल्या आरोग्यासाठीही अतिशय चांगले असते. त्यामुळे रोजच्या पोळ्यांच्या कणकेत सोयाबिन घालायला हवे असे सांगितले जाते. पाण्यात सोयाबिनचे काही दाणे भिजवून ठेवले आणि हे पाणी रोपांना दिले तर फुलं येण्यास मदत होते. यामध्ये असलेले फॉस्फेट खताप्रमाणे काम करत असून त्यामुळे रोपाला पोषण मिळण्यास मदत होते.
२. बटाटा
बरेचदा रोपांची पाने अचानक कोमेजतात. अशावेळी बटाट्याचे काप पाण्यात भिजवून ठेवले आणि ते पाणी रोपांना दिल्यास बटाट्यातील नायट्रोजन पाण्यात मिसळले जाते आणि रोपांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
३. केळ्याची साले
केळं खाल्ली की आपण सालं फेकून देतो. पण तसे न करता ती पाण्यात भिजवून ठेवावीत. त्यामुळे पोटॅशियमची निर्मिती होते. रोपांची वेगाने वाढ होण्यासाठी हे पोटॅशियम अतिशय आवश्यक असल्याने अशाप्रकारचे केळ्याच्या सालांचे पाणी रोपांना अवश्य घालायला हवे.
४. संत्र्याची साले
संत्री खाल्ली की आपण त्याची सालं फेकून देतो. पण तसे न करता ही साले पाण्यात भिजवून ठेवावीत आणि हे पाणी रोपांना घालावे. त्यामुळे रोपांना कीड लागण्यापासून सुटका होण्यास मदत होते.