आपल्या बागेतली रोपं छान बहरावीत आणि त्यांना मस्त फुलं यावीत यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो. रोपांना दररोज पाणी घालण्यासोबतच महिन्यातून एकदा आपण नर्सरीतून खत आणून तेही या रोपांना घालतो. काही जण घरातल्या ओल्या कचऱ्याचाही खत म्हणून वापर करतात. याशिवाय रोपांची नियमित छाटणी करणे, त्यांची माती उकरुन कुंडीतील कचरा साफ करणे अशा बऱ्याच गोष्टी आपले छोटीसे होम गार्डन जपताना आपण करत असतो. मात्र तरीही आपल्या रोपांची म्हणावी तशी वाढ होतेच असं नाही. अशावेळी जास्त पैसे खर्च न करता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण रोपं छान वाढावीत, त्यांना भरपूर फुलं यावीत यासाठी सोप्या पद्धतीने काही खतांची निर्मिती करु शकतो. ही खतं पाण्यातील असून त्यासाठी पाण्यात काय, कसे भिजत घालायचे ते पाहूया (5 Easy Home made fertilizers for plants gardening tips)...
१. कांद्यामध्ये असलेले फॉस्फेट रोपांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे रोपांना भरपूर फुलं येण्यास मदत होते. कांद्याचे काप पाण्यात भिजवून ठेवावेत आणि ते पाणी रोपांना द्यावे.
२. गाजर आरोग्यासाठी चांगले असते त्याचप्रमाणे रोपांसाठीही उपयुक्त असते. गाजराच्या फोडी पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यातील पोटॅशियम या पाण्यात उतरते आणि ते पाणी रोपांना घातल्यास रोपांच्या फांद्या मजबूत होतात.
३. बिअर आरोग्यासाठी वाईट असते हे आपल्याला माहित आहे, मात्र त्यातील नायट्रोजन रोपांसाठी संजीवनी देणारे ठरते. रोपाची पाने हिरवीगार राहावीत आणि पिवळी पडू नयेत यासाठी बिअर फायदेशीर असते.
४. पाण्यात व्हाईट व्हिनेगर घालून ते पाणी रोपांना दिल्यास त्यातून आयर्न सल्फेट मिळण्यास मदत होते. ज्या रोपांना अॅसिडची आवश्यकता असते अशा रोपांसाठी हे पाणी उपयुक्त असते.
५. पाण्यात सोयाबिन भिजवून ते पाणी रोपांना घातले तर त्यामुळे पोटॅशियम डीहायड्रोजन सल्फेट मिळते आणि रोपांची मुळे मजबूत होऊन जास्त कळ्या येण्यास मदत होते.