जशी प्रत्येकाची तब्येत वेगळी, प्रत्येकाचे आरोग्य आणि त्यानुसार लागणारा आहार वेगवेगळा, तसंच माणसांप्रमाणेच झाडांचंही असतं... प्रत्येक झाडाचं खत, उन, पाणी आणि माती यांचं वेगवेगळं गणित ठरलेलं असतं. त्यांच्या ठरलेल्या योग्य प्रमाणानुसार जर झाडांना सगळं काही मिळत गेलं तर झाडंही जोमाने बहरून येतात. त्यांची चांगली वाढ होऊन त्यांना फुलेही भरपूर येतात.
गुलाब (how to take care of rose plants) हा फुलांचा राजा. त्यामुळे प्रत्येक घरी किमान एक तरी गुलाबाचं रोपटं असतंच. मोजक्या ४- ५ कुंड्या ज्या घरात असतील, त्या घरातही एका कुंडीत गुलाबाचं रोपटं मोठ्या प्रेमाने विराजमान झालेलं असतं.. पण या गुलाबाला जर फुलंच आली नाहीत, तर मात्र मग आपली बाग अगदी निरस दिसू लागते आणि मन खट्टू ही होतं.. म्हणूनच गुलाबाच्या रोपट्याची चांगली वाढ व्हावी आणि अगदी बहारदार फुले यावीत यासाठी हे ५ उपाय करून बघा. उपाय अगदी सोपे आहेत, पण गुलाबासाठी खूपच परिणामकारक ठरणारे आहेत.
गुलाबाला फुलं येण्यासाठी अशी घ्या काळजी....
१. गुलाबाला फुलं येत नसतील तर कदाचित गुलाबाच्या अशक्त झालेल्या फांद्या किंवा झाडावर पडलेला रोग हे देखील त्यासाठीचं एक कारण असू शकतं. त्यामुळे झाडांचं बारकाईने निरिक्षण करा आणि झाडाच्या अशक्त फांद्या कापून झाडाची छाटणी करा. छाटणी केल्यानेही झाडाची वाढ चांगली होते आणि झाडाला भरपूर फुले येतात. गुलाबाच्या फुलांची छाटणी करताना फांदीवरचे दोन- तीन डोळेही कापावे, म्हणजे नवीन फुले चांगली येतात.
२. गुलाबाला खूप जास्त पाणी घालू नका. कुंडीतली माती कोरडी झाली तरच झाडाला पाणी द्यावे. माती ओलसर होईल, एवढेच पाणी द्या. हिवाळ्यात एक दिवसाआड पाणी दिले तरी चालेल. उन्हाळ्यात दररोज माती ओलसर होईल, एवढे पाणी द्या.
३. गुलाबाच्या झाडावर आठवड्यातून एकदा किटकनाशक फवारा. हे किटकनाशक घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते. यासाठी दोन चमचे तंबाखू एक लीटर पाण्यात चोवीस तास भिजत ठेवा. त्यानंतर गाळण्याने हे पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात एक चिमुटभर वॉशिंग पावडर टाका. मिश्रण चांगले ढवळून घ्या आणि किटकनाशक म्हणून झाडावर फवारा. हे मिश्रण तुम्ही १५ दिवस वापरू शकता. यामुळेही झाडाची वाढ चांगली होऊन भरपूर फुले येतात.
४. गुलाबाला फुलं येत नसतील, तर माती बदलून पहा. नवी माती टाकताना कुंडीत सगळ्यात खाली थोडी वाळू टाका. त्यानंतर माती टाका. या मातीत थोडे शेण टाका. शेण गुलाबासाठी पोषक आहे. कुंडीतली माती कडक होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. माती कडक झाली आहे, असे वाटले तर ती हलक्या हाताने उकरून भुसभुशीत करून घ्या.
५. वाळलेले शेण आणि संत्री, लिंबू, मोसंबी अशा फळांची साले एक बादली पाण्यात दोन ते तीन दिवस राहू द्या. यानंतर या पाण्यात अर्धी बादली चांगले पाणी टाका. पाण्यातून सालं काढून टाका आणि नंतर हे पाणी गुलाबाला द्या. भरपूर फुलं येण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.