Join us  

घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2023 4:50 PM

Air purifying and low maintenance Plants Gardening Tips : घरातील हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त घराची शोभा वाढवणारी रोपं..

आपल्या घराच्या टेरेसमध्ये, गॅलरीत किंवा अगदी खिडकीच्या ग्रीलमध्ये एखादी छोटीशी बाग असावी अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. छान रंगबिरंगी फुले आलेली ही बाग घराची शोभा तर वाढवतेच पण ही झाडं आपलाही मूड फ्रेश करतात. हे सगळं जरी खरं असलं तरी ही रोपं आणण्यापासून ते ती कुंडीत लावण्यापर्यंत आणि नियमित त्याला पाणी घालणे, खत घालणे, कापणी करणे, किड लागली असेल तर ती साफ करणे अशी एक ना अनेक कामं करावी लागतात. मात्र रोजच्या धकाधकीत आपल्याला हा वेळ मिलतोच असे नाही (Air purifying and low maintenance Plants Gardening Tips). 

मग अतिशय उत्साहात लावलेल्या झाडांची अगदी अवस्था होऊन जाते. सुकलेल्या झाडांच्या कांड्या शिल्लक राहील्या की त्या पाहून आपण लक्ष दिलं नाही याची एक वेगळीच खंत आपल्याला वाटत राहते. मात्र असे होऊ नये म्हणून हे सगळे करण्यापेक्षा घरात लावता येतील अशी काही रोपं लावल्यास दोन्ही उद्देश साध्य होतील. या रोपांना फारच कमी मेंटेनन्स लागत असल्याने आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचा ताणही येणार नाही. विशेष म्हणजे ही रोपं घरातील हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने सुशोभिकरणाबरोबरच आरोग्यासाठीही त्याचा चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

१. मनी प्लांट - छोटी बाटली, शोभेचे पॉट अशा कशातही राहणारे हे मनी प्लांट वास्तूशास्त्रात विशेष महत्त्वाचे आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे असे हे रोप अंगणात आवर्जून लावायला हवे. विशेष सूर्यप्रकाश नाही मिळाला तरी तग धरणारे आणि डोळ्यांना आल्हाददायक वाटेल असे हे मनी प्लांट मागील काही वर्षात भारतीयांच्या बगिचात आले. 

२. पीस लिली - बाथरुम, ड्राय बाल्कनी, किचनमध्ये सिंकपाशी बऱ्यापैकी ओलावा असतो. काही वेळा या भागांची स्वच्छता न झाल्यास त्याठिकाणी बुरशी, काहीशी ओल येण्याची शक्यता असते. या वनस्पतीमुळे हवेतील ओलावा शोषला जातो आणि भोवतालचा भाग कोरडा होण्यास मदत होते. अशाप्रकारे शांतपणे आपले काम करत असल्याने या वनस्पतीच्या नावातच पीस हा शब्द असावा. 

(Image : Google)

३. स्पायडर प्लांट - घरात ज्याठिकाणी सर्वाधिक उजेड येतो अशा ठिकाणी हे रोप ठेवल्यास त्याची वाढ चांगली होते. मात्र थेट सूर्यप्रकाश पडणे उपयोगाचे नाही. या रोपाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे तुम्ही हे झाड लिव्हींग रुम किंवा बेडरुममध्येही सहज ठेऊ शकता. वातावरणातील कार्बन मोनॉक्साइडची तीव्रता कमी करुन ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी हे रोप उत्तम आहे.

४. रबर प्लांट - हवेमध्ये असणारे विषाणू किंवा रसायने यांचे प्रमाण कमी होण्यासाठी या रोपाचा अतिशय चांगला उपयोग होतो. हवा शु्द्ध करुन वातावरण चांगले ठेवण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त असून. हवेतील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही घरातील जास्त वेळ बेडरुममध्ये घालवत असाल तर याठिकाणी ही वनस्पती लावणे फायद्याचे ठरते. 

(Image : Google)

५. स्नेक प्लांट - हे रोप रात्रीही ऑक्सिजनची निर्मिती करते. हवेतील विविध प्रकारच्या गॅसेसपासून संरक्षण करण्याचे काम या रोपाद्वारे होते. त्यामुळे घरातील लिव्हींग रुम, बे़डरुम याठिकाणी आपण हे रोप आवर्जून ठेवू शकतो. या रोपाला आठवड्यातून एकदाच पाणी दिले तरीही पुरते. परंतु घरातील शुद्ध आणि स्वच्छ हवेसाठी हे रोप घरात असायला हवे. 

६. अरेका पाम - हवा शुध्द करण्यात या वनस्पतीचा दर्जा सर्वात उच्च आहे. अरेका पाम हवेतील फार्मेल्डिहाइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यासारखे विषारी गॅस घालवून शुध्द ऑक्सिजन पुरवतं. ही वनस्पती घरात किंवा घराच्या आजूबाजूला लावली तर घरात येणारी हवा शुध्द होते.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स