अंजना देवस्थळे
आज वट पौर्णिमा. यानिमित्तानं वडाच्या झाडाचे आपल्या परिसंस्थेतलं महत्त्व, त्याची गरज हे सारंही यानिमित्तानं समजून घेतलं तर वडाच्या झाडाची नव्यानं ओळख होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या या दिवसात वडाच्या पारंब्या वाढतात. त्यात प्लाण्ट हार्मोन असतं. त्यामुळे या पारंब्यांचा औषधी उपयोगही केला जातो. विशेषत: केस वाढीसाठीच्या औषधांत पारंब्या वापरतात. फर्टिलिटी वाढण्यासाठीच्या औषधांत त्यांचा उपयोग केला जातो. वृद्धीच्या औषधांत वापरल्या जातात. आपल्याकडे प्रत्येक सणाला एका झाडाचं महत्त्व आहे. त्यातही आपली स्थानिक वड-पिंपळ-उंबर ही जी झाडं आहेत, तीत अनेक पक्ष्यांची घरं आहेत. पक्ष्यांना निवारा आणि पुरेसं अन्न ही झाडं देतात. एक वडाचं झाड शेकडो पक्ष्यांचं घर असू शकतं. केवळ पक्षीच नाही तर खारी-माकडं या प्राण्यांनाही आश्रय-अन्न ही झाडं देतात. त्यांच्यासाठी ही मोठी झाडी फार महत्त्वाची असतात. आणि त्याच पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बियांतून ही झाडं रुजतात.
(Image : Google)
वडाच्या झाडाखालची माती आपल्या शेतात नेऊन टाकण्याची पूर्वी एक रीत होती. वडाच्या झाडाखालची माती सकस असते, असे म्हणतात. एकतर वडाचा एवढा मोठा पर्णसंभार, पानं गळतात तेव्हा ती मातीत कुजतात. या झाडांवर भरपूर पक्षी राहतात, त्यांची विष्ठा पडते. त्यातूनही वडाखालची माती सकस झालेली असते. त्यामुळेही ती शेतात टाकत असतील.वडाचं एक झाड असं अनेक गोष्टी देतं. आपल्या स्थानिक परिसंस्थेत, प्राणी-पक्ष्यांसाठीही वडाची झाडं असणं, ती आपण टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे.वडाचं झाड आपल्या आसपास असणं असं आनंदाचं आहे.
(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)anjanahorticulture@gmail.com