तुळशीला आयुर्वेदात जितके महत्त्व आहे तितकेच अध्यात्मातही आहे. त्यामुळे आपल्या घरात इतर कोणती रोपे नसतील तरी ठिक आहे पण तुळशीचे रोप आवर्जून असायलाच हवे. काही ठिकाणी तुळस खूप बहरते तर काही ठिकाणी हीच तुळस पार वाळून जाते. कडक उन्हामुळे तर तुळस सुकल्याची तक्रार बऱ्याच महिला करताना दिसतात. आता उन्हाळ्यात तुळस सावलीत ठेवली तर सूर्यप्रकाश न मिळाल्याने ती सुकून जाकते. नाहीतर कडक उन्हामुळे ती पार वाळून गेलेली दिसते. मग एक तुळस वाळली की आपण बाजारातून दुसरी आणून लावतो पण तिही वाळून जाते. असे वारंवार होत असेल तर आपले काहीतरी चुकत आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. तुळस वाळू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी यााविषयी...
१. खूप जास्त सूर्यप्रकाश लागणे
दिवसभरात तुळशीला ६ ते ८ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. मात्र हा सूर्यप्रकाश थेट पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी नाहीतर तुळस जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळेल पण थेट ऊन तुळशीवर पडणार नाही अशी काळजी घेऊन तुळशीचे रोप ठेवायला हवे. शक्य असल्यास ठराविक वेळाने हे रोप थोडे सावलीत ठेवण्यास हरकत नाही.
२. विशिष्ट मातीची आवश्यकता नाही
तुळस येण्यासाठी कोणत्या विशिष्ट प्रकारच्या मातीची आवश्यकता नसते. तर कोणत्याही प्रकारच्या मातीत तुळस चांगल्या पद्धतीने वाढते. कोणत्याही प्रकारच्या स्थानिक मातीत हे रोप अतिशय चांगल्या पद्धतीने फुलते पण चिकणमाती असेल तर या रोपाची मुळे अधिक चांगल्या पद्धतीने रोवली जातात. तुळस उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय वातावरणात वाढते. तुळशीचे रोप वाढायला जास्त दिवस लागतात त्यामुळे हे रोप लगेच आले नाही तरी धीर सोडू नये.
३. जास्त वेळा पाणी घालणे
उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमान जास्त असल्याने आपल्यालाही जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे रोपांमधील मातीही उन्हामुळे पूर्ण सुकून जाते. अशावेळी या रोपांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी घालणे आवश्यत असते. त्यामुळे उन्हाळ्यात न चुकता तुळशीला दोन ते तीन वेळा पाणी घाला.
४. वेळोवेळी कापणी करणे
अनेकदा रोपाला वरपर्यंत पोषण न मिळाल्याने रोपाची पाने, फांद्या वाळून जातात. मात्र अशावेळी रोपाची योग्य पद्धतीने कापणी करावी. सुकलेली पाने किंवा काड्या काढून टाकल्यास आवश्यक त्या ठिकाणी पोषण मिळून हे तुळशीचे रोप चांगले वाढू शकते.
५. तापमान नियंत्रणात ठेवणे
आपल्या शरीराचे तापमान जास्त झाल्यास आपल्याला ज्याप्रमाणे त्रास होतो त्याचप्रमाणे रोपांनाही तापमान जास्त झाल्यास त्रास होण्याची शक्यता असते. तुळशीला ऊब लागणे आवश्यक असून खूप ऊन लागणे योग्य नाही. त्यामुळे त्या हिशोबाने या रोपाची जागा उन्हाळ्यापुरती बदलायला हवी. किंवा सर्वच झाड़ांना योग्य प्रमाणात ऊन लागावे यासाठी त्यांच्यावर एखादी शेड घालायला हवी.