आघाड्याची पाने तशी पाहिली तर अगदी लहान असतात. पण ही पानं पुजेत नसली तर पुजा पुर्ण होत नाही. या पानांना पुजेत एवढे महत्त्व यासाठी असते की त्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. आघाडा ही वनस्पती भूक वाढविणारी आणि वातदोषासह हृदयरोग आणि अनेक आजारांवर गुणकारी आहे. आघाड्याचा उपयोग करून श्वसनासंबंधी अनेक आजारांवरही मात करता येते.
औषधी उपयोग करण्यासाठी आघाड्याची पाने वाळवून ती जाळली जातात आणि त्यापासून राख तयार केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर उपाय म्हणून ही राख वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. काही आजारांमध्ये ही राख घालून त्याचे पाणी प्यायले जाते तर काही आजारांमध्ये मधात टाकून ही राख घेतात. याबाबत असे सांगितले जाते की आघाड्याची राख पाण्यात मिसळल्यानंतर ते पाणी उन्हात सुकवतात. जेव्हा सगळे पाणी आटून जाते तेव्हा मीठासारखा पदार्थ उरतो. या पदार्थाला आघाड्याचा क्षार असे म्हणतात. या क्षारामध्ये अनेक आरोग्यदायी खनिजे असतात.
आघाडा वनस्पतीचे फायदे१. आघाड्याचा काढा अतिशय पाचक असतो. अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. २. किडनी संदर्भात काही आजार असतील, तर आघाडा अतिशय परिणामकारक ठरतो. काही संसर्गामुळे मुत्र नलिकेत दाह होत असल्यास आघाड्याचा काढा घेतल्याने हा त्रास कमी होतो. ३. शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी म्हणजेच फॅटबर्नसाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत. ४. दमा, अस्थमा, जुनाट खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठी आघाड्याचा क्षार खूपच परिणामकारक असतो. ५. दात किंवा हिरड्या दुखत असल्यास आघाड्याच्या पानांचा रस काढावा आणि तो हिरड्यांवर चोळावा. दातदुखीतून लगेचच आराम मिळतो.
आघाड्याची भाजीही असते चवदारआघाड्याच्या कोवळ्या पानांची अतिशय चवदार भाजी करता येते. यासाठी सगळ्यात आधी आघाड्याची पाने धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या. यानंतर कढईत तेल, मोहरी, लसूण घालून फोडणी करून घ्यावी. यानंतर थोडा कांदा टाकून परतून घ्यावा आणि त्यानंतर मग चिरलेला आघाडा टाकावा. चवीनुसार तिखट आणि मीठ टाकून चांगली वाफ येऊ द्यावी. एक वाफ आल्यानंतर डाळीचे पीठ टाकावे आणि सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्यावी. पुन्हा एकदा झाकण ठेवावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी.