Join us  

कुंडीतला कडीपत्ता भरभर वाढण्यासाठी करा १ सोपी ट्रिक; कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 1:02 PM

Best Home made Fertilizer for kadi patta : कडीपत्ता कसा लावायचा आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत घरीच कसे तयार करायचे पाहूया...

कडीपत्ता हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा घटक. मसाल्यातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा हा कडीपत्ता आरोग्यासाठी तर फायदेशीर असतोच पण पदार्थाला चव येण्यासाठीही आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता घालतो. विविध आजारांबरोबरच केसांसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो. हा चविष्ट हिरवागार कडीपत्ता अनेकदा घरी आणला की लगेच वाळून जातो. वाळला की कडीपत्त्याची पूर्ण चवच जाते, काही वेळा तर हा कडीपत्ता इतका काळा पडतो की तो फेकून द्यावा लागतो. मात्र आपल्याला लागेल तेव्हा झाडाचा ताजा कडीपत्ता वापरायला मिळाला तर? आपल्या घरातल्या कुंडीत कडीपत्ता लावला तर तो आपण लागेल तसा वापरु शकतो. यासाठी हा कडीपत्ता कसा लावायचा आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत घरीच कसे तयार करायचे पाहूया (Best Home made Fertilizer for kadi patta)... 

(Image : Google )

घरात कडीपत्ता कसा लावायचा? 

एकतर तुम्ही बियांची मदत घेऊ शकता किंवा कढीपत्त्याच्या झाडाची कलमे घेऊन किंवा रोपातील बिया काढून ते वाढवू शकता. जर तुमच्या जवळ कढीपत्त्याचे झाड असेल तर तुम्ही ते झाड सहज वाढवू शकता. जर नसेल तर तुम्हाला ते बाजारातून घ्यावे लागेल कारण ते फक्त दोन प्रकारे पिकवता येते. मोठ्या कॅनमध्ये चांगल्या प्रतीची माती, सुकलेली पानं, कंपोस्ट खत सगळं एकत्र करावं. त्यानंतर यावर किचनमधील ओला कचरा घालावा. यामध्ये कडीपत्त्याच्या बिया घालाव्यात. केवळ एका बिपासून नाही तर अनेक बिया एकत्र पेरल्या जातात तेव्हाच चांगली पाने असलेली रोपं येतात. फक्त दोन आठवड्यातून एकदा खत घातल्यास आणि रोज थोडे पाणी देत ​​राहिल्यास हे रोप छान फुलायला सुरुवात होते. हे खतही बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरीच तयार केले तर? पाहूयात कडीपत्त्यासाठी घरच्या घरी खत तयार करण्याची सोपी पद्धत

घरच्या घरी खत तयार करण्याची पद्धत...

आंबट दही किंवा ताक हे कडीपत्त्यासाठी सर्वात उत्तम खत असते. ३ ते ४ दिवस जुने असलेले आंबट दह्याचे पातळ ताक करुन ते कडीपत्त्याच्या रोपात घातल्यास कडीपत्ता हिरवागार आणि वेगाने वाढण्यास मदत होते. यासाठी कडीपत्त्याच्या रोपाच्या आजुबाजूची माती थोडी मोकळी करुन त्यामध्ये हे ताक पाणी घालतो त्याप्रमाणे १ मग घालावे. याशिवाय किटकनाशक म्हणून रोपावर फवारणी करण्यासाठीही आपण या ताकाचा वापर करु शकतो. यामुळे कडीपत्त्याला किड लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते.   

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स