देवेंद्र देवस्थळे
काल सुभाष अवचटांचे पुस्तक वाचत होतो, नावचं वेगळं "don't paint the clue". त्यात ‘झाडं’ याविषयावर लेख होता. त्यांच्या स्टुडिओत कशी फांदी यायची - त्यावरून खारी, मैना, पोपट कसे यायचे याचे वर्णन केलं होतं. आम्ही ‘नक्षत्र’ नावाच्या बहूमजली उंचच उंच इमारतीत राहायला येऊन जवळ जवळ १२ वर्षे झाली. आत्तापर्यंत जमिनीवरच (तळ मजल्यावर) आयुष्य काढल्यानं वरच्या मजल्याचं अप्रूपही होतं अन भीतीही. जमिनीशी संपर्क तुटेल का? आपल्या झाडांचं काय होणार?
तीन दिशा उघडं असलेलं घर, सर्व बाजूंनी मोकळं. त्यामुळे ऊन, वारा आणि पाऊस याला उधाणच होतं. समोर हिरवी झाडी होती. रोज सकाळी सूर्याचे उत्तरायण/दक्षिणायन बघत होतो, समोरचा डोंगर बघून एअर क्वालिटी इंडेक्स ठरवत होतो. साधारण सूर्योदयाला तलावावरची वटवाघळे पूर्वेकडून नैऋत्येकडे जाताना व सूर्यास्ताला परतताना दिसायची.
आम्हाला जसं याच अप्रूप होतं तसं इतरांनाही आमचं.
सुरुवातीला खारुताई आल्या, - सुप्रभात म्हणून गेल्या. नंतर राघू - पोपट आले. वेडीवाकडी मान करून कोण आलंय हे बघिततं. साळुंक्या, कावळे, पोपट, एकदा तर घुबडसुद्धा वस्तीला होतं. झाडांची काळजी मिटली होती, फ्लॉवर बेड होताच. अंजना -चारुने जुने ड्रम फॅक्टरीतून (भंगारात जाणारे) आणले, कापले - त्याला भोके पाडली. त्यात घरचा कचरा, भाजीची देठ टाकायला सुरवात केली. सफाईवाल्याला सांगितले, सकाळी आमच्याकडे कचरा विचारू नको, आम्ही "शून्य कचरा" ठरवलाय. झाडांसाठी माती विकत आणायची नाही असं ठरवलं होतं.
कावळे, कबुतर यांचा बंदोबस्त करायचाच होता. एकदा सकाळी सकाळी गुटुरगु गुटुरगु सुरु. लक्षात आले की बाहेर खिडकीच्या वर एक खण आहे. तिथे कबुतर बसायला लागलीत, तिथे एक प्लायवुड चा तुकडा ठोकला. खार त्याहून हुशार, तिने त्याला सुरेख भोक पाडले, पिल्ले घालायला. हळूहळू छान माती तयार होऊ लागली आणि आम्ही झाड लावायला घेतली.
खरबुजाची बिया पडून त्यात खरबूज उगवले होते, दुधी आला होता. नेहेमीपेक्षा हल्ली खारुताई फ्रेंडली झालीय असं वाटत होते. एकदा तर ती चक्क थँक यू म्हणाली. चमकलो- घोटाळलो. बघितलं तर खरबूज बाहेरच्या बाजूने पूर्ण छान पोखरून खाल्ले होते, दुधी नाहीसा झाला होता. मग लक्षात आलं की मैनापण खुश आहेत आपल्यावर. कुंडीतली गांडूळ हळूहळू नाहीशी होत होती. कबुतरांची जाळी लावली - खार हसली. दुसरे दिवशी जाळी दाताने कुरतडलेली दिसली.
झाडं बदलायला हवीत आता. अंजनाने परत वेगळी झाड ठरवली. दक्षिणेची खोली गरम होते हे जाणवले, तिथे वेल चढवली, दक्षिण झाकायला. देवघरात कुठेतरी भिंतीवर उगवलेला पिंपळ चारुने आणून लावला होता. तोही वाढला होता. त्याची एक बारीक फांदी बाहेर डुलत असायची. दोन मैना बसल्या होत्या तिथे - वाऱ्यावर झोके घेत. शिळोप्याच्या गप्पा मारत असाव्यात बहुतेक. त्यांचा फोटो काढून मी कोणाकोणाच्या नावाने चेष्टाही करत होतो.
कधीतरी कावळा बसू लागला होता. अंजना किंवा मृदुला दिसली की उडायचा नि स्वैपाकघरात यायचा. तिकडे काव काव सुरु व्हायची. खायला दे - खायला दे हट्ट!नवीन झाडात एक निळ्या रंगांची फुले येणारे झाड होते. त्यावर शिंजीर - गाणारा पक्षी येऊ लागला. जास्वंद लावले, खार खूश. फुलेच येईनात. नंतर लक्षात आलं की कळ्या खाल्ल्या जाताहेत. हळूहळू झाडे वाढू लागली, फांद्या लांब गेल्या. आता फुलांपर्यंत खार पोचेना - पण शिंजीर येऊ लागला. मध पिऊ लागला. गोकर्ण लागले, चवळी लागली. पक्षी वाढू लागले, चिमण्या, मैना, बुलबुल, पोपट नांदू लागले. भांडकुदळ मैना कर्कश्य आवाजात ऐन दुपारी भांडत बसायच्या, कलहप्रिया नाव सार्थक करत. तुळशीच्या खोडाची साल ओढायला मुनिया येऊ लागले. गवती चहाचे पानेही तोडायचा. सुतळी ठेवली होती चिमणीसाठी, तार शोधायला कावळे यायचे. घरट्याची जमवाजमव सर्वांनाच करावी लागते.
दक्षिणेकडे (आग्नेय खिडकीत ) नवीन इमारती येऊ लागला होत्या. पडदे लावायची वेळ आली होती. त्याऐवजी वेल चढवले. पॅशन फ्रुट लावले, मग कंद.. भसाभस वेल वाढू लागले. संपूर्ण दक्षिण भरली. त्यात बुलबुलाने घरटे केले. पॅशन फ्रुट्स लागली. उत्तरेकडे मनी प्लांट होता. विपिंग विलोजसारख्या फांद्या खालपर्यंत लोंबत होत्या. त्यातही मुनियाने घरटे केले होते, कावळा आला की त्यातली अंडी खाऊन गेला. दोन वेळा असं झालं. तिसऱ्या वेळी परत घरट्याची वेळ झाली, आम्हालाच नको नको झालं. नशिबाने त्यांनी विचार बदलला. पश्चिमेला कामिनी लावली. रात्री पश्चिम वारा यायचा. एकदा रात्री दोन वाजता संपूर्ण खोलीत घमघमाट. मी दचकून जागा झालो. बघितलं तर कामिनी फुलली होती. त्याचवेळी बदलापूरलाही कामिनी फुलली होती. अंजना म्हणाली कामिनी सर्वत्र एकदमच फुलते. काय निसर्गाची रचना आहे !!
आमच्या दक्षिणेला एका खिडकीत चमेली लावली. ती बाहेर वाढत गेली. चमेलीचा सुगंध दरवळू लागला. अबोली फक्त फुले दिसण्यासाठी ठेवली, सदैव बहरलेली अबोली. तुळस पण उभी एका बाजूला. छान दक्षिण झाकली गेली, गरम झळाही कमी झाल्या. एका छोट्या कुंडीत रोझमेरीचं झाड होत. गोकर्ण होता. कोवीड आला तो काळ. सगळे घरात. काय करायचं? खूप कल्पना सुटलं गेल्या. सुदैवाने कच्चा माल होता, उत्साहही. निरनिराळी पेय बनवली मंद सुवास रोझमेरीचा, गोकर्ण वापरून रंग बदलणारे पेय बनवले. दालचिनी, वेलची, नागवेल, गवती चहा याबरोबर वोडका किंवा रम - घरात कल्पकता बहरली होती, वेळ होता, हाताशी गोष्टी होत्या. कोविडचे सर्व दिवस अंजना रोज नवीन पदार्थ बागेचा वापर करून करत होती.
एका झाडाची फांदी मोडली, काढली नाही तशीच राहू दिली. लक्षात आले की रात्री त्यावर चतुर झोपायला येतात. ५-५ /७-७ चतुर उलटे लटकून झोपलेले दिसायचे. संध्याकाळीच आम्ही ती खिडकी बंद करायचो, त्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून. कधीतरी पपई यायची, डेंग्यूची साथ असली की रोग्याकडे आम्ही ताजी पाने नेऊन द्यायचो, तो बरा होईपर्यंत. घरची पपई कधी खायला मिळाली नाही पण लोकांचे आशीर्वाद खूप मिळाले. आणि अचानक..सोसायटीला रंग लावायचा बूट निघाला. बाहेरून आलेल्या माणसाला सोसायटी चांगली दिसली पाहिजे. सर्वांची झाडे काढून टाकावी असेही ठरले. चतूर हल्ली येत नाही, शिंजीर फिरकत नाही, डुलणाऱ्या फांदीवरची मैना, कावळे निघून गेलेत. दक्षिणेचे ऊन वाढलेय, दिवसाही एसी सुरु झालाय. समोरची सोसायटी जवळ आली म्हणून पडदे ओढून ठेवतो हल्ली. आत मात्र दिवा लावतो. घरचा कचरा अजून तरी गोळा करून शेतावर नेतोय, पण खरकटे पाणी वाहून जातेय.
आता बाहेरून आलेल्याना छान रंगवलेली सोसायटी दिसेल, आम्ही?आम्ही मात्र भकास भिंती, सिमेंटची जंगलं आणि लोखंडी खिडक्या बघणार. बाहेरचा माणूस सोसायटीचा रंग बघून व्वा म्हणतो, आम्हाला घरातून रंग दिसत नाही. काही जणांनी प्लॅस्टिकची झाडे आणलीत, रिसायकल्ड आहेत, पाणीही घालायला लागत नाही म्हणून सांगितले. बरेच जण आपल्या कंपनीत पर्यावरण दिन साजरा करतात. उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाणी ठेवतात, घरटीही लावली आहेत. कुत्री पाळली आहेत, मांजरीही. मुक्या प्राण्यांवर दया दाखवायलाच हवी.कालाय तस्मै नमाः !!