Join us  

गुलाबाची छाटणी करण्याची परफेक्ट पद्धत, फुटेल नवी पालवी- रोपाला येतील फुलंच फुलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 5:58 PM

Easy tips for Rose Plant Care and Pruning for blooming : छाटणी किंवा कापणी करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित हवी.

आपल्या बाल्कनीत, अंगणात अगदी मोजक्या ४-५ कुंड्या असल्या तरी त्यापैकी एक कुंडी गुलाबाची असतेच असते. आपण रोपांना नियमित पाणी घालतो पण त्यांच्याकडे बारकाईने पाहायला आपल्याला कधीतरीच वेळ मिळतो. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आपण रोपांची मशागत करण्यासाठी आवर्जून वेळ काढतो आणि मग रोपांची छाटणी, स्वच्छता, त्यांना खत देणे, किटकनाशके फवारणे अशा गोष्टी करतो. त्यानंतर बरेच दिवस कोमेजलेली रोपं फुलायला लागतात आणि मग आपल्याला होणारा आनंद अवर्णनिय असतो (Easy tips for Rose Plant Care and Pruning for blooming). 

गुलाब बरेचदा नुसताच वाढत राहतो पण त्याला फुलं काही येत नाहीत. गुलाब बहरावा आणि त्याला भरपूर फुलं यावीत तर या रोपाची वेळच्या वेळी छाटणी करावी लागते. नव्याने पालवी फुटते त्याच ठिकाणी गुलाबाला कळ्या येतात. पण ही छाटणी नेमकी कशी करायची ते आपल्याला माहित असतंच असं नाही. काही जण गुलाबाच्या फांद्या, पाने कुठेही कापतात. पण असे केल्याने पालवी फुटत नाही तर रोप खराब होते. त्यामुळे छाटणी किंवा कापणी करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित हवी. आता ही पद्धत कोणती ते समजून घेऊया... 

१. गुलाबाला ज्याठिकाणी फुलं येऊन गेली आहेत आणि फांदी नुसतीच वाढली आहे अशा ठिकाणी गुलाबाची फांदी कापायची.

२. ही फांदी कापताना ती फांदीचा जॉईंट असतो त्याच्या वर कापायची म्हणजे त्याठिकाणी नवीन पालवी येण्याची शक्यता असते.

३. फांदी कापताना ती एकदम सरळ न कापता थोडीशी तिरकी कापायची जेणेकरुन नवीन पालवी येण्याची क्रिया लवकर होऊ शकते.

४. फांद्या कापल्यावर रोप वाढेल का असा प्रश्न आपल्याला पडतो. पण रोपाची नीट वाढ व्हायची असेल तर गुलाबाच्या अनावश्यक वाढलेल्या  फांद्या कापाव्याच लागतात.

५. गुलाबाला खत देताना त्याच्या मुळाजवळ असणारी माती आधी मोकळी करुन घ्यायची. त्यानंतर शेणखत हे गुलाबासाठी सर्वात उत्तम खत असल्याने तेच वापरलेलं केव्हाही जास्त चांगलं. 

६. याशिवाय चहा केल्यावर खाली उरणारी चहा पावडर वाळवून गुलाबाच्या रोपात घालावी. महिन्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास गुलाब चांगला बहरण्यास मदत होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स