ऋतूबदलाचा आपल्यावर जसा परीणाम होतो त्याचप्रमाणे प्राणी, पक्षी, झाडं, रोप यांसारख्या इतर सजीवांवरही होतो. हिवाळ्यात रोपं छान बहरलेली आणि हिरवीगार असतात, या काळात त्यांना भरपूर फुलंही येतात. पण उन्हाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला म्हणजे वसंत ऋतूचे आगमन होताना मात्र अचानक ही रोपं काहीशी कोमेजल्यासारखी होतात. एकाएकी रोपांची वाढ खुंटल्यासारखी होते आणि फुलंही येईनाशी होतात. हवेतील बदलांचा रोपांच्या वाढीवर होणारा हा एकप्रकारे परीणाम असतो. पण ऋतूबदल होताना आपण आरोग्याची ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याचप्रमाणे रोपांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. वर्षानुवर्ष जपलेली रोपं नेहमीसारखी छान हिरवीगार राहावीत, त्यांना भरपूर फुलं यावीत यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूयात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही घराच्या बागेतली रोपं छान फुललेली राहावीत यासाठी नेमकं काय करायचं...
१. रोपाची वाढ अचानक खुंटली असेल तर सरळ ते रोप आहे त्या कुंडीतून काढून एका वेगळ्या कुंडीत नवीन माती घेऊन त्यात ते व्यवस्थित लावावे. माती बदलल्यामुळे कदाचित रोपाला चांगले पोषण मिळण्यास आणि त्याची वाढ होण्यास मदत होऊ शकते. हे करताना यामध्ये चांगले खत घातल्यास त्याचाही चांगला फायदा होण्यास मदत होते. यामध्ये रोपाला, रोपाच्या मुळांना हवा लागल्याने कदाचित रोप वाढण्यास मदत होते.
२. रोपाची माती बदलणे शक्य नसेल तर कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूट्रीशन्ट घ्यायचे. ही पावडर साधारण १ ते १.५ ग्रॅम घेऊन १ लिटर पाण्यात ती चांगले मिसळायची. पाण्यात ही पावडर एकजीव करायची आणि हे पाणी दर ३ ते ४ दिवसांनी रोपांना घालायचे. जवळपास ३ ते ४ वेळा हा प्रयोग सलग केल्यास रोपांना चांगले पोषण मिळते आणि रोपांची आधीसारखी चांगली वाढ होण्यास मदत होते.