टेरेस गार्डन हे अनेकांचे स्वप्न असते, पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हेच न समजल्याने हे काम मागे पडते. मनाला प्रसन्न करणारी अशी झाडे आपल्या टेरेस गार्डनमध्ये लावल्यास आपण नकळत उत्साही राहण्यास मदत होते. दिसायला सुंदर, स्वच्छ हवा देणारी आणि डोळ्यालाही गारवा देणारी ही झाडे आपण अगदी कमी कष्टामध्ये आपल्या बाल्कनीत लावू शकतो. सामान्यपणे आपण घरात झाडं लावायची म्हटलं की एकतर फुलांची लावतो किंवा शोभेची. पण थोडे नियोजन केले आणि माहिती घेतली तर याठिकाणी आपल्याला पुरेल अशी फळबागही आपण फुलवू शकतो.
बाजारातून आणलेली फळं खाल्ली की त्या बिया आपण अगदी सहज फेकून देतो. पण तसे न करता प्रत्येक वेळी फळांच्या बिया जपून ठेवल्या तर? घरच्या घरी कुंडीत आपण त्याचे झाड लावून त्यातून मिळालेली गोड, रसदार फळे आपण पुढे कितीतरी काळ खाऊ शकतो. शहरात राहात असूनही आपल्याला अशाप्रकारे आपल्या बागेतून तोडलेले फळ खाण्याचा आनंद नक्कीच मिळू शकतो. आपल्या टेरेसमध्ये किंवा बाल्कनीत झाडांसाठी जागा किती, सूर्यप्रकाश कसा आहे, आपल्याला वाफा करायचा की कुंडीत झाडं लावायची या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्या आणि कामाला लागा. कुंडीत कोणत्या फळांची झाडे सहज येऊ शकतात, ती उंचीने किती वाढतात, त्याची निगा कशी राखायची याबाबत माहिती घेऊया...
१. फळझाडे ही बऱ्यापैकी वाढणारी झाडे असतात, त्यामुळे ती लहानशा कुंडीत न लावता मातीच्या मोठ्या कुंडीत किंवा हल्ली झाडं लावण्यासाठी एकप्रकारची पिशवीसारखी पोती मिळतात त्यात लावा. वाफा करुन जमिनीवर लावणार असाल तर उत्तमच. नाहीतर थर्माकॉलच्या बॉक्समध्येही लावू शकता. तसेच मोठ्या आकाराचे ड्रम, वाया गेलेले डबे, घरातील थोडेसे फुटलेले माठ, बादल्या यांचा तुम्हाला बाग फुलवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. सुरुवातीला बी रुजण्यासाठी लहान कुंडीत लावली तरी काही काळाने ती मोठ्या कुंडीत लावा.
२. बोर, चेरी, अंजीर, केळी, डाळींब, सिताफळ, पेरू, चिकू, आवळा यांसारखी झाडे वर्षभर फळे देतात. पण आंबा, फणस, सिताफळ यांच्या फळांसाठी साधारण तीन वर्षे वाट पहावी लागते. मात्र त्यांची वेळोवेळी निगा राखावीच लागते. काही काळाने या झाडाला फळं का येत नाहीत, नीट रुजलं नाही का असे प्रश्न आपल्याला पडतात. पण ही फळे यायला साधारण तेवढाच वेळ लागत असल्याने चिंता करण्याचे कारण नाही.
३. तुमच्या टेरेसमध्ये किंवा बाल्कनीत जास्त कडक ऊन असेल तर याठिकाणी शेडनेटची सुविधा करायला हवी. त्यामुळे झाडं कडक ऊन लागून सुकून जाणार नाहीत तर सावलीत ती सुरक्षित राहतील. यामध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश लागेल अशा जाळ्या उपलब्ध असतात.
४. फळझाडे लावताना दोन झाडांमध्ये पुरेसे अंतर असेल याची काळजी घ्यावी. पुरेसे अंतर ठेवले नाही तर याठिकाणची आर्द्रता वाढते आणि हवा खेळता राहत नाही. त्यामुळे झाडांना योग्य पद्धतीने श्वास घेता येत नाही आणि त्यांची वाढ खुंटते. तसेच आर्द्रता जास्त वाढल्यास या झाडांवर रोग किंवा किड पडते.
५. तुम्ही विटा, प्लास्टीक यांचा वापर करुन वाफा करुन झाडे लावणार असाल तर त्यांची मशागत करणे सोपे होते. कारण एकाच ठिकाणमी चौरस, आयताकृती, त्रिकोण, षटकोन करुन प्रत्येक कोपऱ्यात एक झाड लावता येते. तसेच जागा जास्त असेल तर मध्यभागीही एखादे लहानसे झाड लावता येते.
६. पेरु, डाळींब, अंजीर, बोरं अशा बहुतांश फळांच्या बिया या अतिशय लहान असतात. तसेच त्या पटकन वाळतात. त्यामुळे या बिया फळ खाऊन झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवा. त्या जास्त वाळतील इतका वेळ मधे घालवू नका. त्याच दिवशी किंवा फारतर त्याच्या पुढच्या दिवशी या बिया कुंडीत किंवा वाफ्यात छान रुजवा.
७. चिकू किंवा आवळा यांसारख्या बिया थोड्या हाताता पकडता येतील इतक्या मोठ्या असतात. त्यामुळे त्या वाळल्या की थोड्या फोडा आणि मग रुजवा. त्यामुळे त्यांना लवकर अंकुर फुटण्याची शक्यता असते. या नव्याने लावलेल्या झाडांना नियमितपणे पाणी घालत राहा. कधीकधी यातून अंकुर फुटायला वेळ लागू शकतो. पण त्यासाठी वाट पाहणे हा एकमेव पर्याय असतो.
८. इतर झाडांप्रमाणेच या झाडांच्याही वाळलेल्या फांद्या काढणे, रोग लागला आहे का याकडे लक्ष देणे. किडे, मुंग्या ही रोपे खाऊन खराब करत नाहीत ना याकडे लक्ष देणे, ठराविक काळाने माती भुसभुशीत करणे, त्याला खत देणे आणि सर्वात महत्त्वाचे नियमित योग्य तितके पाणी देत राहणे महत्त्वाचे असते.