Join us  

सुगंधाकडे नेणारी पायवाट, 'त्या फुलांच्या गंधकोषी' घेऊन जाणारा एक सुंदर अनुभव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 4:54 PM

अंजना देवस्थळे. सोसायटीच्या आवारापासून ते बदलापूरच्या तिच्या शेतापर्यंत स्वतः वृक्षवल्ली लावून, इतरांनाही सहज प्रेरित करून, सक्षम करून, खूप मोठं काम गाजावाजा न करता शांतपणे करणारी एक मैत्रिण. तिचं पुस्तकंही पाऱ्यासारख्या निसटणाऱ्या गंधसंवेदनेचं सेलेब्रेशन आहे

ठळक मुद्दे"आपल्याला एखादं दृश्य, नाद ,स्पर्श किंवा चव यापेक्षा एखाद्या वासाची आठवण रहाण्याची शक्यता शंभर टक्के आधिक असते".

अरुंधती देवस्थळे

अगदी अकृत्रिम, जुन्या मैत्रिणीने उत्साहाने सांगावी तशी झाडांची, रोपांची माहिती म्हणजे अंजना देवस्थळे हे समीकरण आता सगळ्या हौशी बागकाम करू इच्छिणाऱ्यांच्या मनात रुजलेलं आहे. सामान्य वाचकांच्या मनातले प्रश्न ओळखून उदारहस्ते दिलेली माहिती, तिच्या थेट अनुभवातून आलेली. त्याआधारे कोणीही ते रोप, झाडं, कंद-मुळ लावून बघावं आणि त्याची देखभाल करून 'फळं चाखावीत'. हॉर्टिकल्चरचा ॲकेडेमिकली अभ्यास केलेला असून, तिच्या बोलण्या- लिहीण्यात जी सहजता आहे, ती निसर्ग जगणाऱ्या व्यक्तीतच असू शकते. अशी माणसं शक्य तिथे, अगदी राहतात त्या सोसायटीच्या आवारापासून ते बदलापूरच्या तिच्या शेतापर्यंत स्वतः वृक्षवल्ली लावून, तिचं परिपोषण करून पृथ्वीला संजीवन देत रहातात. इतरांनाही त्यासाठी सहज प्रेरित करून, सक्षम करून, खूप मोठं काम गाजावाजा न करता करत असतात. तिच्या छोट्या कार्यशाळांमध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध वयोगटांसाठी, ती माहिती अगदी त्या वयाची होऊन सांगत असते. अगदी नैसर्गिकपणे. कृत्रिमता बोलण्या-शिकवण्यातही नाही आणि लेखनातही नाही.

(Photo :  Anjana Dewasthale, Twitter)

Enchanting Fragrant Gardens : Plants for Fragrance हे तिचं नव्याने आलेलं पुस्तक. त्या फुलांच्या गंधकोषी घेऊन जाणारं. पण आधीच सांगून ठेवायला हवं हे पुस्तक म्हणजे व्यवहारिक मार्गदर्शक पुस्तक नव्हे. ही ६२ वेगवेगळ्या जातीच्या गंधवतींची चित्रांनिशी फक्त ओळख आहे, वेध घेण्याच्या मोहात पाडणारी झलक आहे. हे एक इंग्लीशमध्ये म्हणतात तसं 'टीझर' आहे. सुगंधाचं नेमकं वर्णन करणं अतिशय कठीण असतं,त्याच्या आसपास जाण्यासाठी मागोवाच घ्यावा लागतो. तो ह्या पुस्तकाच्या वाचकाने घ्यायचा आहे आणि त्या गंधाला आपल्या जीवनात कसं आवतन द्यायचं हे बघायचं आहे. कारण अंजना तिच्या मनोगतात म्हणते तसं: "आपल्याला एखादं दृश्य, नाद ,स्पर्श किंवा चव यापेक्षा एखाद्या वासाची आठवण रहाण्याची शक्यता शंभर टक्के आधिक असते".झुळूकेवर आरूढ होऊन येणाऱ्या आणि सुखानुभूतिने आपले डोळे मिटलेले असतांनाच नाहीशा होणाऱ्या गंधाची जादू अनुभवली नसेल असं कोणीतरी असेल का या जगात? हे पुस्तक म्हणजे त्याच पाऱ्यासारख्या निसटणाऱ्या गंधसंवेदनेचं सेलेब्रेशन आहे. गंधाला कुठले नियम लागू नसतात, तसे चारचौघा पुस्तकांचे साचेबद्ध नियम ह्या पुस्तकालाही लागू नाहीत, सुरुवातीलाच ह्या सुगंधी रोपं, झाडं किंवा वेळी लावणार असाल तर काय पूर्वतयारी करायला हवी यावर मुद्देसूद टीप्स आहेत त्या उत्साही सुरुवात करू पहाणाऱ्याना आणि माळीकामात रंगणाऱ्यांना फार उपयोगाच्या. जसं की दोन वेगळी सुगंधी रोपं शेजारी लावू नका, त्यांचे गंध दबले जातील. हे जर रात्री सुगंध देणारी आणि दिवस सुगंधित होणारी झाडं जवळजवळ लावलीत तर दोघांच्या गंधांना त्यांची 'स्पेस ' मिळेल आणि तुम्हाला दोघांचा आस्वादही.प्रत्येक फुलाचं बोटॅनिकल आणि बोलीभाषेतलं नाव दिल्याने त्याचा मागोवा घेणं सहज शक्य होणारं आहे. सोबतीला सुंदर छायाचित्रे आहेतच आणि त्याच्या बहरण्याचा ऋतूही. पुस्तकाच्या सुरुवातीलाच भेटते, अहा ! नाजुक शुभ्रवसना कामिनी. आणि मग सुरु होणाऱ्या गंध यात्रेत मोगरा, तगर, सोनटक्का, बकुळ ,चाफा परिवार, कमळ, जाई, जुई, चमेली, कुंद, मदनबाण वगैरे तबीयतदार मंडळी एकेक करून हजेरी लावतात. त्यात सीताअशोकासारखा एखादा लाजराबुजरा ही असतो. पण त्याला आंब्याच्या मोहोराची किंवा पपयाच्या मंदगंधाची साथ असते.मोगऱ्याच्या सुवासाचा चहा अनेकांनी प्यायलेला असतो पण जुईनेही ती जादू शक्य असते यासारख्या काही गोष्टी नव्याने समजतात. अर्थात नाजुकसाजुक फुलाला गरम चहात सोडण्याचे धैर्य होईल का ? असा प्रश्न माझ्यासारखीला सतावतोच पण अशा प्रश्नांची उत्तरं त्याने-त्याने शोधायची असतात. शिवाय सुकल्या फुलांनीही वेगळाच परिणाम साधता येतो हे कळल्यावर अनेकांना उभारी यावी.

सृष्टिचक्रात ह्यातील प्रत्येकाची भूमिका असतेच, (प्रत्येक झाड हे एक निरपेक्ष दाताच असतं) मधुमालतीसारख्यांची जबाबदारी नव्याने समजते. ही किमान देखभाल मागणारी, भरभरून फुलणारी आणि फुलता-फुलता रंगबदलाचं आगळं वेगळं वरदान लाभलेली, मंद मंद वासाची नाजूक पण चिवट वेल हॉक मॉथसारख्या प्रजातिंना पोषण देते हे किती मोलाचं. नागरमोथा कुडाच्या फुलांसारख्या काहींचे आजीबाईंच्या बटव्यात जाऊन बसणारे औषधी गुणधर्म ही कळले. क्रिस्तोफर कोलंबसने रातराणी देशोदेशी पोहोचवायला कशी मदत केली हे आजकालच्या निर्बंधप्रिय जगात केवढं सुखद वाटतं!निसर्गाशी केवळ गंधमाध्यमाने नव्हे तर त्यापलीकडे जाऊन छोट्या छोट्या तपशीलांतून ओळख करून देणारं हे पुस्तक वेगळेपण जपणारं आहे. अंजनाने हरिताक्षरात लिहीत रहावं आणि फुलापानांचं महत्व आणि सौंदर्य जाणणाऱ्या नव्या उत्साही बागकर्त्यांच्या सार्थक सहभागाने, पुढल्या पिढ्यांसाठी प्रगतीशी डोळस सांगड घालत, धरती सुजलाम सुफलाम होण्यासाठी अत्यावश्यक मदत व्हावी.

Box Quote from the author: मी हे पुस्तक अशासाठी लिहीलं की आपली बाग प्लॅन करताना लोक अनेकदा त्याच त्याच रोपं किंवा झाडांचा विचार करताना दिसतात. अर्थात यात गैर काही नाही. पण उपलब्ध जागेत तिच्या जमीन आणि स्थानिक हवामानाचा विचार करता काही वेगळंही लावता येतं. सहज शक्य असलेले काही पर्याय गंधांच्या मार्गे सुचवावेत म्हणून हा पट त्यांच्यापुढे उघडून ठेवतेय. हे पुस्तक वाचणाऱ्यांना खूप प्रश्न असणार, त्यासाठी मी आहेच, अगदी आनंदाने.                                                                                                                                   Enchanting Fragrant Gardensअंजना देवस्थळेपाने 80, मूल्य 250 रुपये. 

टॅग्स :बागकाम टिप्स