उन्हाळा असल्याने कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. एरवी १० रुपयांत मिळणाऱ्या या पालेभाज्या उन्हाचा तडाखा वाढल्याने ३० ते ४० रुपयांना मिळायला लागल्या आहेत. हिरवीगार कोथिंबीर तर आपल्याला प्रत्येक पदार्थावर लागतेच. त्याशिवाय पदार्थाला रंगत येत नाही. इतकेच नाही तर मेथीची भाजीही आरोग्यासाठी अतिशय पोषक असल्याने आपण आवर्जून मेथी खातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह हे घटक पुरेशा प्रमाणात असतात. मेथी चवीला कडू असली तरी त्यामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. पण महाग झाल्या की मात्र आपण या भाज्या आणताना ४ वेळा विचार करतो. अशावेळी आपल्या किचन गार्डनमध्ये या हिरव्यागार भाज्या असतील तर हव्या तेव्हा तोडून पटकन वापरता येतात. विशेष म्हणजे आपण स्वत:च्या हाताने या भाज्या पिकवल्याने त्या खाण्याची मजा काही औरच असते.
कोथिंबीर लावताना लक्षात ठेवा
१. आपण स्वयंपाकात जे धणे वापरतो त्यापासूनच कोथिंबीर येते. हे धणे कुंडीत पेरुन त्याला नियमित पाणी घातले तर काही दिवसांत कोथिंबीर येते. धणे थोडे ओलसर करुन ते कुंडीत पेरावेत. त्यावर पुन्हा मातीचा एक थर द्यावा. ८ ते १० दिवसांत कोथिंबीर येण्यास सुरुवात होते.
२. यासाठी कुंडी चांगला उजेड आणि हवा असेल अशा ठिकाणी ठेवायला हवी. धण्यातून अंकूर फुटायला बराच वेळ लागत असल्याने वाट पाहणे हा एकमेव पर्याय असतो. नाहीतर कुंडीत सतत उकरुन पाहिले तर हे रोप येणार नाही. कोथिंबीर पूर्ण तयार व्हायला साधारण ३५ ते ४० दिवस लागतात, त्यामुळे त्याआधी कुंडीत उकरुन पाहू नये.
३. तसेच कोथिंबीर अतिशय नाजूक असल्याने त्याला सुरुवातीच्या टप्प्यात तरी कमी पाणी घालावे लागते. जास्त पाणी झाले तर चिखल होऊन कोथिंबीर मरुन जाण्याची शक्यता असते.
४. धणे मातील घालताना त्याचा चुरा करुन न घालता ते पूर्ण घालायला हवेत. यासाठी थोडी पसरट कुंडी किंवा प्लास्टीकचा डबा कुंडी म्हणून घेतल्यास एकावेळी जास्त कोथिंबीर मिळू शकते. कोथिंबीर पूर्ण वाढण्याची वाट पहावी, कोवळी तोडल्यास पुरेशी मिळत नाही.
मेथी लावण्याची योग्य पद्धत
१. आपण घरात ज्या मेथ्याच्या बिया वापरतो त्यापासूनच मेथी तयार होते. पण मेथीचे बी कुंडीत लावल्यास रोप येईल असे आपल्याला वाटते. तर तसे होत नाही. कारण या बिया जास्त कोरड्या असल्याने त्यापासून रोप येण्यास खूप वेळ लागतो.
२. मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात, त्यामुळे हे दाणे फुलतात आणि हलके होतात. नंतर ते पाण्यातून बाहेर काढून एका प्लास्टीकवर किंवा कापडावर वाळत घालावेत. अर्धवट वाळल्यानंतर हे दाणे कुंडीत पेरावेत.
३. मेथीला साधारणपणे थंड हवामान, योग्य सूर्यप्रकाश आणि हवेतील आर्द्रता आवश्यक असते. महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी अशाप्रकारची हवा असल्याने मेथीचे पीक सहज येते. मेथी यायला बऱ्यापैकी जागा लागत असल्याने पसरट किंवा उथळ कुंडी घ्यावी. खूप जास्त किंवा खूप कमी ऊन लागणार नाही असे पाहावे. पाण्याच्या बाबतीतही आवश्यक तितकेच पाणी घालावे.
४. मेथीची पूर्ण वाढ होण्यासाठी जवळपास ३५ ते ४० दिवस लागतात. त्यामुळे मधल्या काळात मेथी व्यवस्थित का येत नाही असा विचार करुन या रोपांशी खेळ करु नये. हे बीज आणि रोप नाजूक असल्याने त्याची नासाडी होण्यास वेळ लागत नाही, त्यामुळे या रोपांची योग्य ती काळजी घ्यावी. यावर किड लागू नये म्हणून त्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे.