Lokmat Sakhi >Gardening > आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

परकीय झाडांची चर्चा करताना त्यांचे फायदे तोटेही आपण समजून घेतले पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 06:08 PM2024-05-30T18:08:34+5:302024-05-30T18:15:12+5:30

परकीय झाडांची चर्चा करताना त्यांचे फायदे तोटेही आपण समजून घेतले पाहिजे.

foreign trees attacks local ecology, besharam tree and importance of local nature conservation | आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

Highlights त्यांच्या बिया पसरतात आणि स्थानिक वनस्पतींवर आक्रमण करून त्यांना पार डावलून यांचे रान माजत.

अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)

१९८८ सालची गोष्ट.आम्ही पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला होतो. अभ्यासक्रम संपला की आम्हाला इंटर्नशिप असायची. गावात राहून, शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन काम करणं, त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्यावर विद्यापीठाने सुचवलेला उपाय अमलात आणणं, हे अपेक्षित होतं. आमचे शेतकरी मांजरी फार्म जवळ शेवाळवाडी या गावाले होते. त्यांची समस्या होती एक नाजुकशी, कातरलेल्या मऊ मऊ पानांची, बारीक बारीक चांदण्यासारखी फुलांची एक वनस्पती. त्याचे नाव गाजर गवत किंवा काँग्रेस ग्रास.

आम्ही शिकलेले, तरुण तडफदार. त्याचा नायनाट करायला दर रविवारी हातमोजे आणि विळा घेऊन शेतात भल्या सकाळी जायचो. गाजर गवत उपटायचं,त्याची मोठी रास करून ठेवायची आणि पुढल्या आठवड्यात ती रास जाळायची. फार मोठी कामगिरी करत असल्याचा आमचा आवेश. हे सगळं करत असताना शेतकऱ्याचा कुटुंबाच्या चेहेऱ्यावर कुत्सित हास्य. त्यांचं काडीचं सहकार्य नसायचं. कामगिरी करून परत आलो, आठ महिन्यांनी रिझल्ट लागला आम्ही उत्तीर्ण झालो म्हणून शेतकऱ्यांना पेढे घेऊन गेलो, बघतो तर काय? शेत जसं होतं तसच ,काँग्रेसग्रास ग्रस्त!!

गाजर गवताच्या बिया आपल्याकडे अमेरिकेतून १९७२ च्या दुष्काळात मदत म्हणून PL 140 नावाच्या गव्हाबरोबर आल्या. भारताचे हवामान त्याला फारच मानवलं. त्याच्या उग्र वासामुळे गायीगुरं, शेळया मेंढ्या तोंड लावत नाहीत, नाजूक फुलातून शेकडो बिया हवेत पसरून पुढली पिढी पेरायला तयार ! या काँग्रेस ग्राससारखी अनेक फुलं परदेशातून आपल्याकडे आली. गोडगोंडस,गोजिरवाणी, निरागस दिसणारी फुलं अशीच पसरत, उद्रेक करत गेली. ही फुलं आणण्याचा सदहेतू होता, कधी बागांचा सौंदर्य वाढवायला, फुलांसाठी तर कधी काही व्यावसायिक कारणांसाठी...

बेशरम नावाचं झाड तुम्हाला आठवतं?

गंमत म्हणजे या झाडाचे प्रत्येक भारतीय भाषेत अर्थ आणि नाव तेच. बेशरम, बेहाया. अगदी विपरीत परिस्थितीत दुष्काळात, दलदलीत टिकून राहणारं हे झाड कुंपणासाठी मेक्सिकोतून आणलं गेलं. पुढे, कुंपणच शेत खातं असं यानं सार्थक केलं. नदीनाले, तलाव, डबक्यांच्या तीरावर लोचटासारखे बेशरम चिकटून राहिले.
परदेशातून आणलेली सगळी झाड काही अशी पसरत नाही. काही विशिष्ट वनस्पतींना आपला देशातल्या हवामान, इथली माती मानवते आणि ते फोफावतात. दुसरे म्हणजे गुरं यांना तोंड लावत नाही, त्यांचे नैसर्गिक शत्रू इथे नसल्यामुळे त्यांच्यावर कशाचाच हल्ला होत नाही. त्यांच्या बिया पसरतात आणि स्थानिक वनस्पतींवर आक्रमण करून त्यांना पार डावलून यांचे रान माजतं.

टणटणी

लहानपणी, घाणेरी उर्फ टणटनीच्या झुडपाखाली आमचा अड्डा असायचा. त्याची इटूकली पिटूकली लाल-पिवळी आकर्षक फुलं आम्ही चोखायचो आणि इवलिशी चकचकीत काळी गोड फळं चघळून बिया वाटेल तिथे थुंकून द्यायचो. आमच्या सारखेच बुलबुल पक्षी याची फळ खात आणि दुसरीकडे जाऊन
शिटतात. असं होत आज ती एवढी पसरली आहे की शेतं- माळरानं सोडा, जिम कॉर्बेट, मधुमलाईचे जंगलही टणटनीग्रस्त आहे. त्याने प्राण्यांचे अधिवास नष्ट झाले. गवताळ भाग हिने काबीज केले त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची चरण्याची आबाळ. कोट्यवधी खर्च करूनही त्याचा नायनाट करायचा एकही उपाय अजून लागू झाला नाही. काहींनी त्याच फर्निचर बनवायचा प्रयत्न केला खरं. पण असं कितीसं वापरात येणार हो?

कॉसमॉस

मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही कात्रजच्या घाटात खास कॉसमॉस पुष्पांचा सोहळा बघायला गेलो होतो. रस्त्याच्या दुतर्फा केशरी पिवळी चटक नाजूक फुलं उंच झाडांवर वाऱ्यासंगत डुलत होती. खूपच सुंदर दृश्य होतं ते, डोळ्यांचं पारण फिटतं. या पुष्प सोहळाने आता भयंकर रूप धारण केले आहे. कात्रजच्या घाटातून दऱ्या खोऱ्यातून पुढे पुढे सरकत पार सासवडपर्यंत कशाचीही तमा न बाळगता पसरत गेली. फक्त रस्त्याच्या दुतर्फात नव्हे तर शेतांमध्ये, कुरणांमध्ये घुसली. अगदी नकोस केलं आहे.

तीव्रगंधा

तीव्रगंधा नावाचा असाच एक प्रकार हल्ली सगळीकडे दिसतो. आपल्या येऊरच्या जंगलात तर खूपच. पूर्वी बांग्लादेशातून अशीच कुठून तरी आली आणि फुलांसाठी बागांमध्ये लावली गेली. अगदी बर्फ पडल्यासारखा देखावा दिसावा अशी याची पांढरी फुलं. त्यावर फुलपाखरं, मधमाश्या, पतंग बागडत असतात. शेकडो बिया तयार होतात. त्या वाऱ्याबरोबर उडून नवीन ठिकाणी ठाण मांडून बसतात. याची पैदास फक्त बियाच नव्हे तर नुसता फांदीचा तुकड्यापासूनही होते.

वडेलिया

बाग काम करताना ग्राउंड कव्हर नावाचा एक प्रकार असतो. माती दिसू नये असा काही लोकांचा हट्ट असतो. त्यासाठी कमी पाण्यावर, भर भर पसरणारी, सूर्यफूलाची लहानशी प्रतिकृती असलेली पिवळी वडेलिया. एक आखूड शिंगी बहु दुधी वनस्पती.अर्थातच परदेशी. या वडेलियाने एकदाका तुमच्या परिसरात घर केलं की काहीही करा ही कुठून तरी डोकं वर करतेच!


 
पाण्यातलं आक्रमण

हा क्रम केवळ जमिनीतच नव्हे तर पाण्यात म्हणजे आपल्या नद्यांमध्ये तलावांमध्ये देखील चालला आहे. phragmitis नावाचं एक गवत,पाणथळ जागेवर वाढतवाढत जलाशयात पसरत जातं. त्याला उपाय म्हणजे ग्रास कार्प नावाचा मासा,जो ह्याची कोवळी पाने खातो. पण भानगड अशी की हा परदेशी मासा आपले स्थानिक मासे पण फस्त करतो त्यांची अंडी खाऊन टाकतो.

वॉटर हैसिंथ

वॉटर हैसिंथ, जल कुंभीची कहाणी तर सर्व दूर पसरली आहे. केरळला बोट राईडला अडथळा करणारी, मुळा मुठा सारख्या अनेक नद्यांचा प्रवाह रोखणारी ही अतिशय सुंदर फुलांची ही जलपर्णी. पाण्यात जिथे सेंद्रिय पदार्थ, सांड पाणी मिसळत तिथे ही फोफावते. भारतातच नव्हे तर जग भर कहर करणारी,डासांच्या पैदासिला कारणीभूत असणारी दक्षिण अमेरिकेची देन! जलपर्णी काढून टाकायला असंख्य अयशस्वी उपाय झाले, होत आहे. त्यातले काही रासायनिक उपाय वादग्रस्तही ठरले. पण आजही परिस्थिती ,जैसे थे.

हे सर्व असं आहे तर,पण आपण काय करू शकतो?

खरं तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही. वृक्ष लागवडीसाठी जसा राष्ट्रीय स्तरावर जनसमूह बाहेर पडतो तसाच यासाठी पण पडावा लागेल. फुलं येण्याच्या आत जर का या वनस्पती उपटल्या तरच त्यांची पुढची पिढी येणार नाही. तोवर आपल्या बागांमध्ये यांच्या सुंदर फुलांच्या मोहात पडून लावू नये आणि प्रसार करू नये.

anjanahorticulture@gmail.com
 

Web Title: foreign trees attacks local ecology, besharam tree and importance of local nature conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.