Join us  

Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 6:47 PM

Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोपटं आपण मोठ्या हौशीने लावतो, पण काहीच दिवसांत ते कोमेजून जातं.. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा...

ठळक मुद्दे या काही साध्या- सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.. मग बघा कशी मस्त बहरेल तुमची बाग.

नर्सरीत एखादा फेरफटका मारला की हमखास एखाद्या रोपट्याचा मोह होतो आणि मोठ्या हौशीने आपण ते घरी आणतो. आता जे लोक नेहमीच बागकाम करतात, त्यांना एखादं रोप कसं लावायचं, त्यावेळी काय काळजी घ्यायची, हे अगदी परफेक्ट माहिती असतं. पण जे नव्याने गार्डनिंग करत असतात, त्यांना मात्र काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की हौसेने आणलेलं रोप घरच्या कुंडीत (repotting of plants) लावलं की अवघ्या काही दिवसांतच कोमेजून जातं... असं झालं की मग खूप वाईट वाटतं.. म्हणूनच तर या काही साध्या- सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.. मग बघा कशी मस्त बहरेल तुमची बाग.(how to take care of plants). 

 

नर्सरीतून आणलेलं रोपटं घरच्या कुंडीत लावताना अशी काळजी घ्या...१. हे काम खूप सावकाशीने करण्याचं आहे. त्यामुळे जेव्हा वेळ असेल तेव्हाच हे काम हाती घ्या.२. रोप दुसऱ्या कुंडीत लावण्याआधी ३ ते ४ तास रोपट्याला व्यवस्थित पाणी द्या. ३. नर्सरीतून आणलेल्या रोपाची कुंडी जेवढी आहे, त्यापेक्षा आपल्या घरची कुंडी दुपटीने मोठी असावी.४. नर्सरीतून आणलेलं रोप जर प्लास्टिकच्या बॅगमध्ये असेल तर ती बॅग सरळ कापता येते. पण रोप जर कुंडीत असेल तर अशावेळी ती कुंडी आडवी करून तीन- चार वेळा जमिनीवर हळूवार आपटा. जेणेकरून कुंडीतील माती सैल होईल आणि रोप बाहेर येणं सोपं होईल. ५. रोप कधीच ओढू नका. ते मातीसकट बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. 

६. ज्या कुंडीत रोप लावणार आहात, ती आधी तयार करून ठेवा. कोणतं रोप आहे, त्यानुसार माती, कोकोपीट, खत, वाळू असं कुंडीत टाकून ठेवा. कुंडीच्या मधोमध एक खड्डा राहू द्या. आपण आणलेलं रोप या मधल्या जागेत व्यवस्थित बसवा. त्यानंतर आजूबाजूने माती टाका.७. कुंडी काठोकाठ भरून कधीही माती टाकू नये. दोन ते तीन बोटांची जागा नेहमी रिकामी ठेवावी. ८. यानंतर रोपट्याला पाणी द्या. खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देऊ नका. कारण या दोन्ही बाबतीमध्ये रोपट्याचे नुकसान होऊ शकते. ९. नुकतंच लावलेलं रोपटं कधीही कडक उन्हात ठेवू नका. सुरुवातीला दोन- तीन दिवस ते थोड्याफार सावलीत किंवा कोवळे ऊन लागेल, अशाच ठिकाणी ठेवावे.१०. रोपट्याला पाणी टाकल्यानंतर कुंडीतून पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो की नाही, याकडेही लक्ष द्यावे. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागपाणीइनडोअर प्लाण्ट्स