घरातील बाग तेव्हाच छान दिसते जेव्हा झाडं छान हिरवीगार दिसतात. झाडं हिरवीगार दिसण्यासाठी केवळ त्यांना रोज पाणी घातलं की झालं काम असं नाही. झाडं निरोगी असतील तर ती छान बहरतील. आपल्या घरातल्या छोट्या बागेत झाडं वाढवणं हे तसं सोपं वाटणार काम मुळात अवघड आहे. कारण झाडं नीट वाढायला हवी तर त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश हवा, ती खूप उन्हात असूनही चालत नाही. तसेच छोट्याशा बागेत झाडांवर कीड पडते ती लगेच एका झाडावरुन दुसर्या झाडावर पसरते. बाग सुकण्यास हे कारणंही कारणीभूत ठरतं.त्यासाठी झाडांकडे बारकाईनं लक्ष असायला हवं. कीड दिसल्यास लगेच उपाय करायला हवेत.त्या उपायांमधे सातत्य हवं आणि झाडांवर कीड पडूच नये याचीही काळजी आधीपासूनच घ्यायला हवी. आपल्या घरातील झाडांवरही जर कीड दिसत असेल तर सोपे उपाय करुन ही कीड घालवता येते.
Image: Google
झाडांवर कीड पडल्यास..
1. झाडांना घालावी आंघोळ
आपल्यला जशी रोज आंघोळ लागते तशाच स्वच्छतेची गरज झाडांचीही असते. घरातली झाडं नीट राहाण्यासाठी आठवड्यातून एक दिवस झाडांना बारकाईनं आंघोळ घालायला हवी. झाडांना पाणी घालणं आणि झाडांना आंघोळ घालणं यात फरक आहे. आठवड्यातून एकदा झाडांची पानं, देठ हे पाण्यानं नीट धुवायला हवेत. झाडांवर किड असेल तर ती जाईपर्यंत रोज झाडांना नीट आंघोळ घालावी. काही कीड इतकी चिवट असते की ती देठांवरुन निघतच नाही. अशा वेळेस घरातला न वापरता टूथब्रश घेऊन त्याने देठांवरील कीड हलक्या हातानं घासावी आणि मग पाण्यानं स्वच्छ धुवावी.
Image: Google
2. बेकिंग पावडरचं औषध
जर झाडांना बुरशीसारखा रोग लागला असेल तर उपाय सोपा आहे. घरात बेकिंग पावडर असतेच. झाडांची ही बुरशी घालवण्यासाठी एक मोठा चमचा बेकिंग पावडर आणि एक मोठा चमचा हॉर्टिकल्चर ऑइल ( नर्सरीमधे मिळते) चार लिटर पाण्यात घालावं. ते चांगलं घोळून घेतल्यावर झाडांना जिथे बुरशी असेल तिथे स्प्रेने हे द्रावण झाडांवर फवारावं. बुरशी घालवण्याचा हा उत्तम उपाय आहे. हॉर्टिकल्चर ऑइल हे घरीही करता येतं. त्यासाठी एक मोठा चमचा भांडे घासायचं लिक्विड घ्यावं. ते एक लिटरेअ पाण्यात घालावं. नंतर या पाण्यात एक मोठा चमचा सोयाबीन तेल घालावं. हे सर्व चांगलं घोळून घ्यावं. घरच्याघरी हॉर्टिकल्चर ऑइल तयार होतं. बुरशी जाईपर्यंत हे औषध रोज फवारावं.
Image: Google
3. तिखटाच्या पाण्याचा शिडकावा
तिखट हे केवळ स्वयंपाकासाठी वापरतात असं नाही तर झाडांवरची कीड घालवण्यासाठी तिखट उपयोगी ठरतं. काही वर्षांपूर्वी ‘ऑबर्न युनिर्व्हसिटी’नं केलेल्या संशोधनानुसार तिखट हे रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जास्त प्रभावी असतं. यासाठी दोन मोठे चमचे तिखट आणि सहा सात थेंब भांडे घासण्याचं लिक्विड डिटर्जंट चार लिटर पाण्यात मिसळावं. ते चांगलं घोळून रात्रभर झाकून ठेवावं. दुसर्या दिवशी स्प्रेनं हे द्रावण झाडांच्या पानांवर फवारावं. हा उपाय कीड घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
Image: Google
4. कडूलिंबाच्या काढ्याचा उपाय
कडूलिंबामधे कीडविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचा उपयोग झाडांवरील कीड घालवण्यासाठीही करता येतो. यासाठी कडूलिंबाची भरपूर पानं घ्यावीत. ती मोठ्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी हेच पाणी चांगलं उकळून घ्यावं. ते थंड करावं. थंड झालेलं पाणी स्प्रे बॉटलमधे भरुन ते झाडांवर फवारावं. कीड असेपर्यंत हा काढा रोज फवारावा. झाडांवर कीड नसली तरी झाडांचं कीडीपासून संरक्षण होण्यासाठी आठवड्यातून एकदा कडूलिंबाचा काढा फवारावा.