छोटीशी रोपटी, झाडं अशी घराभोवती हिरवळ पसरलेली असली की घरही कसं प्रसन्न, टवटवीत दिसू लागतं. झाडांमुळे घराचा माहोलच बदलून जातो, हे अगदी खरं. पण घर, ऑफीस या सगळ्या चक्रात धावताना आता झाडांची विशेष काळजी घ्यायला, त्यांना मेंटेन करायला खूप वेळ नसतो, अशीही अनेक जणींची तक्रार असते. अशा सगळ्या जणींसाठी एक खूप चांगला पर्याय आहे. ज्या झाडांना विशेष लक्ष देण्याची गरज नसते, जी झाडं खूप नाजूक नसतात, अशा झाडांची रोप लावायची आणि आपलं घर, आंगण, टेरेस हिरवंगार, झाडा- फुलांनी बहरलेलं ठेवायचं. अशाच झाडांपैकी एक आहे ॲडेनिअम. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ कांचन बापट (Kanchan Bapat) यांनी नुकताच एक व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ॲडेनिअमचं रोपटं कसं लावायचं इथपासून ते या झाडाची कशी आणि किती काळजी घ्यायची, याविषयी सगळी सविस्तर माहिती दिली आहे.
कांचन बापट यांच्या टेरेस गार्डनमध्ये ॲडेनिअमची जणू बागच फुललेली आहे. अगदी अंगठ्या एवढ्या रोपट्यापासून ते मोठ्या झाडापर्यंत ॲडेनिअमचे अनेक प्रकार त्यांच्याकडे आहेत. ॲडेनिअम हे त्यांचं सगळ्यात आवडीचं झाडं असंही त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की या झाडाची कोणतीही विशेष काळजी घेण्याची गरज नसते. बी किंवा फांदी या माध्यमातून तुम्ही झाड लावू शकता. झाड लावलं की सुरूवातीला ८ ते १० दिवस ते सावलीतच ठेवा आणि त्याला रोज थोडं थोडं हलक्या हाताने पाणी घाला. त्यानंतर या झाडाला एक दिवसाआड पाणी घातलं तरी चालतं. झाड मोठं झालं तर त्याला तीन चार दिवसातून एकदा पाणी दिलं तरी चालतं. त्यामुळे मराठवाड्यासारख्या कमी पाणी असलेल्या भागासाठी हे झाड उत्तम आहे. बरेचदा अनेक भागात उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. अशावेळी झाडं जगवायची कशी, असा प्रश्न पडतो. अशा ठिकाणी ॲडेनिअमचं झाड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
ॲडेनिअमचं झाड लावायचं कसं?याविषयी सांगताना कांचन बापट म्हणाल्या की बी पासून झाड लावायचं असेल, तर एखाद्या अगदी लहानशा कुंडीत तुम्ही त्याचं रोपटं तयार करू शकतां.रोपटं तयार करण्यासाठी सुरूवातीला कुंडीच्या तळाशी पेपर टाका. त्यानंतर त्यावर एक कोकोपीटचा थर द्या. त्यावर ॲडेनिअमच्या कही बिया टाका. पुन्हा त्यावरून कोकोपीटचा थर द्या. रोज या झाडला हलक्या हाताने पाणी द्या.- रोप उगवलं आणि थोडं वाढलं की ते मोठ्या कुंडीत हलवा.- मोठ्या कुंडीत रोप लावण्याआधी कुंडीच्या तळाशी काही पेपर किंवा कपडा टाका.- त्यानंतर त्यावर तुटलेल्या मातीच्या कुंडीचे काही तुकडे टाका. त्यावर काही नारळाच्या शेंड्या टाका.- ॲडेनिअमसाठी पाणी कमी धरून ठेवणाऱ्या मातीची गरज असते.
- त्यामुळे ॲडेनिअमसाठी दोन भाग साधी माती, एक भाग वाळू आणि एक भाग कोकोपीट असं मिश्रण तयार करा. - नारळाच्या शेंडीवर आपण तयार केलेलं हे मिश्रण टाका. त्यात अलगदपणे रोप ठेवा. वरून पुन्हा आपण तयार केलेल्या मातीचा थर द्या. रोपट्याची छान वाढ होईल. या रोपट्याची वर सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या.- साधारणपणे वर्षभरात या रोपट्याला फुले येतील. - कुंडीचा आकार जेवढा मोठा, तेवढी झाडाची जास्त वाढ होते.- झाड वाढलं की ते पसरट आणि बुटक्या कुंडीत लावा. त्यामुळे या झाडाचं सौंदर्य आणखी खुलून येईल.