आपल्या घरात असणाऱ्या छोट्याशा गार्डनमध्ये इतर कोणती रोपं असोत किंवा नसोत. तुळस आपल्या सगळ्यांच्या दारात आवर्जून असतेच. कधी घराच्या गॅलरीत, खिडकीच्या ग्रीलमध्ये किंवा अगदीच जागा नसेल तर दारात तरी आपण तुळशीचे रोप आवर्जून लावतोच लावतो. तुळशीला आपल्याकडे धार्मिक महत्त्व तर आहेच पण तुळस सर्वाधिक ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने तुळशीचे शास्त्रीयदृष्ट्याही बरेच महत्त्व आहे. इतकेच नाही तर आयुर्वेदातही तुळशीला बरेच महत्त्व असून कित्येक आजारांवर तुळशीच्या पानांचा काढा फायदेशीर ठरतो. म्हणूनच आपल्याकडे तुळशीची आवर्जून पूजाही केली जाते. ही तुळस छान हिरवीगार डेरेदार आली तर ठिक नाहीतर आपल्याकडे तुळस का येत नाही अशी चिंता अनेकांना सतावते (Gardening Tips For Basil Tulasi Plant).
तुळशीला आपण नियमित पाणी घालत असल्याने ती तग धरुन असते. थोडीफार वाढतेही पण ती म्हणावी तशी डेरेदार फुलत नाही. काही दिवसांनी या रोपाची पानं गळायला लागतात आणि नुसत्या काड्या दिसायला लागतात. अशावेळी तुळशीची पानं का वाढत नाहीत असा प्रश्न आपल्याला पडतो. आता अशाप्रकारे तुळस वाळून जाण्याची अनेक कारणे असू शकतात. या रोपाला पुरेसे पोषण न मिळाल्याने, हवा-ऊन न मिळाल्याने तुळशीचे रोप जिवंत असले तरी ते हिरवेगार फुलत नाही. मग आपण रोज पाणी घालतो तरी तुळस सुकून जाते अशी चिंता आपल्याला वाटायला लागते. तुमच्याही घरातली तुळस अशीच वाळून गेली असेल आणि त्याला भरपूर पाने, मंजिऱ्या येत नसतील तर काय करावं याविषयी...
१. योग्य प्रमाणातच ऊन हवे
तुळशीच्या रोपाला जास्त प्रमाणात ऊन लागले तरी ती वाळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या तुळशीची जागा योग्य आहे ना ते तपासा. अन्यथा पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशाठिकाणी तुळशीचे रोप ठेवा. त्यामुळे ते चांगले बहरुन येण्यास मदत होईल.
२. पाणी घालताना लक्षात ठेवा
आपण इतर झाडांना पाईपने किंवा मगने पाणी घालतो. त्यामुळे माती पूर्ण भिजेपर्यंत किंवा काहीवेळा पाणी थोडे खाली येईपर्यंत आपण हे पाणी घालतो. मात्र तुळशीला इतक्या जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तुळशीला अर्धा भांडेही पाणी पुरते, पाणी प्रमाणापेक्षा जास्त झाले तरी तुळशीचे रोप कोमेजून जाण्याची शक्यता असते.
३. कडुलिंबाच्या पानांची पावडर
तुळशीला कडुलिंबाच्या पानांची पावडर करुन घातली तरी ती बहरुन येण्यास मदत होते. इतर झाडांना आपण ज्याप्रमाणे खत घालतो त्याचप्रमाणे तुळशीला पोषण मिळावे यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुळशीला जोमाने पाने येण्यास सुरुवात होते आणि सुकून गेलेली तुळस बहरते.