आपल्या छोट्याशा होम गार्डनमध्ये एखादं तरी गुलाबाचं रोप असतंच. या गुलाबाला एकाएकी ४-५ फुलं येतात आणि नंतर बरेच दिवस फुलंच येत नाहीत. मग पुन्हा एखाद्या फांदीला पालवी फुटते आणि कळ्या दिसायला लागतात. गुलाबाच्या रोपाला कायम फुलं आलेली असतील तर ते रोप छान दिसतं. यामध्ये बटण गुलाब, गावठी गुलाब, मल्टीकलर गुलाब असे गुलाबाचे बरेच प्रकार असतात. पण नेहमी हे रोप फुललेलं राहत नाही. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर गुलाबाच्या रोपाला नियमित कळ्या आणि फुलं येऊ शकतात. यासाठी अगदी सोप्या गोष्टी करण्याची आवश्यकता असून त्याबाबत वेळीच माहिती घ्यायला हवी. म्हणजे हे गुलाबाचं रोप कायम छान फुललेलं दिसेल (Gardening Tips for continue flowering of rose plant).
१. माती दर काही दिवसांनी वर-खाली करत राहावी, त्यानंतर रोपाला पाणी घालावे. तसेच पाणी घातल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी माती थोडी उकरावी. यामुळे मुळांना थोडी हवा लागते, तसचे पाणी रोपाच्या शेवटच्या मुळापर्यंत योग्य पद्धतीने झिरपण्यास मदत होते आणि रोपाची चांगल्या पद्धतीने वाढ होते.
२. रोपाला पूर्ण प्रकाश लागेल अशाठिकाणी ठेवायला हवे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोपाला चांगला सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यायला हवी. यामुळे रोपाची पूर्ण वाढ होते. कडक उन्हाने पानं अगदीच वाळल्यासारखी होत असतील तरच रोपाला दुपारी सावलीत ठेवा अन्यथा उन्हातच ठेवा.
३. शेणाच्या गोवऱ्यांचे खत देणे हा गुलाबाला फुलं येण्यासाठीचा एक चांगला उपाय आहे. कुंडीतील वरची माती काढून त्यामध्ये या गोवऱ्यांचे बारीक तुकडे घालायचे. त्यानंतर पुन्हा माती घालायची आणि मग पाणी घालायचे.
४. रोपाला कीड लागू नये यासाठी महिन्यातून एकदा तरी किटकनाशकांची फवारणी करायला हवी. यामुळे किड लागून रोप खराब होण्यापासून वाचते. आपण रोपांना पाणी घालतो पण पानं आणि फांद्यांवर पाणी शिंपडतोच असं नाही. पण आठवड्यातून एक ते दोन वेळा रोपावरही पाणी शिंपडावे त्यामुळे रोप फ्रेश राहण्यास मदत होईल.