गेले काही दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दुपारनंतर धो धो कोसळणारा हा पाऊस जनजीवन विस्कळीत करत असल्याने आपण काहीसा वैताग करतो. पण पाण्याची वर्षभर लागणारी आवश्यकता लक्षात घेऊन आपण पावसाचे आभारही मानतो. असा हा पाऊस सलग पडत असेल तर आपल्याला ज्याप्रमाणे नको नको होते त्याचप्रमाणे घराच्या लहानशा गार्डनमध्ये असणाऱ्या रोपांचेही काही प्रमाणात होते. सतत पाऊस पडल्याने ही रोपं उघडी असतील तर त्यात पूर्ण चिखल होऊन जातो. मात्र ही रोपं एखाद्या शेडखाली असतील तर मात्र या रोपांमध्ये नुसता ओलावा टिकून राहण्यास मदत होते. आपले होम गार्डन हे कधी गॅलरीत, कधी लहानशा बाल्कनीत तर कधी खिडकीच्या ग्रीलमध्ये नाहीतर चक्क दारासमोर असलेल्या जागेत बहरलेले असते (Gardening Tips for giving water to plants in monsoon season).
एरवी आपण सकाळी किंवा संध्याकाळी वेळ होईल त्याप्रमाणे या रोपांना पाणी घालतो. मात्र सलग पाऊस पडत असेल तर रोपांना किती प्रमाणात आणि कसे पाणी घालावे हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आधीच पावसाचे पाणी आणि त्यात आपण घातलेले पाणी हे जास्त होऊन रोपं कुजण्याची शक्यता असते. तसेच या कुंड्यांमध्ये पाणी साठून राहीले तर त्यात एकप्रकारचा चिकट थर जमा होतो आणि मग यामध्ये डास, चिलटं, माश्या घोंगावण्यास सुरुवात होते. म्हणूनच पावसाळ्यात किंवा जास्त पाऊस पडत असेल तेव्हा कुंडीतील रोपांना किती पाणी घालायचे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
१. रोपांचा प्रकार
आपल्या कुंडीमध्ये असलेल्या रोपाचा प्रकार लक्षात घेऊन त्यानुसार त्याला पाणी द्यायला हवे. भरपूर फुलं येणारे मोठ्या आकाराचे रोप असेल तर त्यामध्ये पटकन कोरड पडू शकते. अशावेळी जास्त पाऊस असतानाही अशा रोपाला आवश्यकतेनुसार पाणी घालायला हवे. पण पावसाचे पाणी कुंडीत पडले असेल आणि रोपाला आणखी पाण्याची आवश्यकता नसेल तर पाणी नाही घातले तरी हरकत नाही कारण त्या ओलाव्यावर रोपं चांगली तग धरु शकतात.
२. रोपांवर शेड असावी
काही वेळा आपली रोपं बाल्कनीत, दारासमोर किंवा खिडकीत ओपन असतात. अशावेळी पावसाचे पाणी थेट कुंडीत पडते. सलग २ ते ३ दिवस हे पाणी पडत राहीले तर रोपांमध्ये पाणी साचते आणि ही चांगली वाढलेली रोपं कुजण्याची शक्यता असते. त्यामुळे पाऊस पडत असताना रोपांमध्ये किती पाणी पडते याचा अंदाज घ्यायला हवा आणि त्यानुसारच पाणी घालायला हवे. शक्य असल्यास किमान पावसाळ्यापुरती रोपं शेडमध्ये ठेवावीत जेणेकरुन त्यामध्ये खूप जास्त पाणी साठणार नाही.
३. कुंडीतील केरकचरा साफ करा
काहीवेळा आपण पुजेचे पाणी रोपांना घालतो. तसेच रोपांचा स्वत:चा किंवा आजुबाजूच्या रोपांचा पालापाचोळा कुंडीमध्ये पडतो. पक्ष्यांची विष्ठा किंवा अन्य कचराही यामध्ये साचतो. त्यामुळे पाणी मुरण्याच्या क्रियेमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते. तसेच माती मोकळी केलेली नसेल आणि खूप दिवस तशीच असेल तरी पाणी मुरण्यास अडथळे येतात. त्यामुळे कुंडीतील रोपाच्या आजुबाजूचा कचरा साफ करावा आणि माती शक्य तितकी मोकळी करुन ठेवावी.
४. कुंडीत पाणी पडते की नाही तपासावे
काही रोपांच्या फांद्या आणि पाने मोठी आणि जाडसर असतात. अशावेळी पाऊस पडला तरी हे पाणी रोपांच्या मुळांपर्यंत जातच नाही. हे पाणी कुंडीच्या आजुबाजूला आणि पानांवर पडते आणि खालच्या खाली वाहून जाते. अशावेळी कुंडीत रोपांच्या मुळांशी खरंच पाणी पडते का हे तपासावे आणि त्याप्रमाणे रोपांना वेळच्या वेळी पाणी द्यावे. काहीवेळा पावसाचे पाणी मिळते म्हणून आपण रोपांना पाणी देत नाही पण हे पाणीही मातीत मुरत नाही. अशावेळी रोपं पाणी न मिळाल्याने सुकण्याची शक्यता असते.