सगळ्यात जास्त वेलचीचं उत्पादन भारतात होतं. वेलचीला मसाल्यांची राणी म्हणतात कारण ती सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मसाल्यांच्या यादीत क्रमांक ३ वर येते. चहापासून भाजीच्या मसाल्यांपर्यंत, गोड पदार्थांमध्ये स्वाद भरणारी वेलची आपण आपल्या टेरेसमधल्या छोट्याशा कुंडीतही लावू शकतो. थोडी मेहनत घ्यावी लागते, पण आपल्या गरजेपुरती वेलची आपल्या घरातच आपण उगवू शकतो. म्हणूनच तर बघा घरच्याघरी बियांपासून वेलचीचं रोपटं (how to plant cardamom in terrace garden) कसं लावायचं आणि त्याची कशी काळजी घ्यायची.
वेलचीचं रोपटं लावण्यासाठी....१. जुन्या, वाळलेल्या वेलचीच्या बिया नको. फ्रेश बिया असणं गरजेचं आहे. त्यामुळे दुकानदाराला वेलची खूप जुन्या आहेत का ते आधी विचारा आणि त्यानंतरच त्या खरेदी करा.२. आपण आणलेल्या वेलचींमधून मोठ्या, टपोऱ्या वेलची निवडून घ्या. ३. एक भांडं घ्या. त्यात पाणी टाका. आपण निवडलेल्या वेलची त्या पाण्यात १- २ तासांसाठी भिजत ठेवा.
४. आता वेलची बऱ्यापैकी फुलून आलेली दिसेल. आता ही वेलची रुजविण्यासाठी तयार आहे. वेलची पाण्यातून काढा. जी वेलची सगळ्यात जास्त फुगली असेल आणि हिरव्या रंगाची दिसत असेल, अशाच वेलची रुजविण्यासाठी निवडा. ५. रुजविण्यासाठी निवडलेल्या फुगीर विलायच्यांची टरफलं काढून टाका आणि त्यातल्या बिया काढून घ्या. आता या बिया आपल्याला कुंडीत लावायच्या आहेत. ६. एका कुंडीत माती, रेती आणि कोकोपीट समान प्रमाणात घ्या. त्यावर वेलचीच्या बिया अलगद टाका. बियांवरून पुन्हा एकदा अलगद कोकोपीटचा थर टाका. वरून हलक्या हाताने पाणी घाला.७. ही कुंडी सावलीतच ठेवा. कुंडीतलं पाणी सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या.८. जवळपास ९० दिवसांनंतर वेलचीचं २५ ते ३० सेमी लांबीचं रोपटं फुलून येईल.