बाल्कनीतल्या किंवा अंगणातल्या एखाद्या कोपऱ्यात कमळ खुललं असेल तर त्या अंगणाची, बाल्कनीची शोभा निश्चितच वाढते... अजूनही टेरेस गार्डनमध्ये कमळाचं फूल असणं हे अप्रुप वाटण्यासारखी गोष्ट आहे. कारण एखाद्याच घरात ते दिसतं.. कमळ घरात लावणं हे खूप कठीण आहे, असं अनेक जणांना वाटतं. पण खरंतर तसं मुळीच नाही. या काही साध्या- सोप्या गोष्टी माहिती असल्या तर कमळ आपल्याही घरी फुलू शकतं.. म्हणूनच तर वाचा ही माहिती, बघा काही व्हिडिओ आणि लावून टाका घरी कमळ (How to grow lotus plant).
बियांपासून कमळाचे रोप कसे तयार करावे...
- सगळ्यात आधी कमळाच्या बिया आणाव्या. पुजेचे सामान ज्यांच्याकडे मिळते, त्यांच्याकडे कमळाच्या बिया अगदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध असतात.
- आणलेल्या बियांपैकी कोणत्या रूजण्यास योग्य आहेत, त्याचे परीक्षण करावे. यासाठी एक कप भरून पाणी घ्या. त्यात बिया टाका. ज्या तरंगतील त्या मृत आहेत असे समजावे. ज्या पाण्यात बुडतील त्या रोपे तयार करण्यासाठी योग्य आहेत.
- आता या चांगल्या बिया घ्या. बियांचा टोकदार भाग पॉलिश पेपरवर घासा. जोपर्यंत बियांच्या आतील पांढरा भाग दिसत नाही, तोपर्यंत घासावे.
- घासलेल्या बिया १५ ते २० दिवस पाण्यात ठेवा. पाणी रोज बदला. कारण त्याला रंग सुटतो आणि पाण्याला घाण वास येतो. यासाठी आपण छोटी बरणी किंवा कुंडीचा वापर करू शकतो. यासाठी वापरायचे पाणी खूप गार किंवा खूप गरम नको. कोमट पाणी असल्यास उत्तम. ३ ते ४ दिवसांनी बियांना तडाजाईल. ८ दिवसांनी त्यातून कोंब फुटलेला दिसेल.
- आता कोंब फुटल्यानंतर बियांना जेव्हा पाने येतील आणि पानांचा आकार वाढून ती साधारण १ किंवा २ रूपयांच्या नाण्याच्या आकाराएवढी होतील, तेव्हा ती आपल्याला दुसऱ्या कुंडी टाकावी लागतील.
- त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा टब घ्या. त्यात शेणखत, शेतातली काळी चिकट माती आणि वाळू हे समप्रमाणात टाका. हे मिश्रण ३ ते ४ तास भिजू द्या.
- त्यानंतर हे मिश्रण मध्यम आकाराच्या कुंडीत टाका. त्यात आपली कमळाची रुजलेली बी लावा. वरतून पाणी घाला. एका कुंडीत एकच बी लावा. त्यानंतर सगळ्या कुंड्यांमध्ये पाणी टाका. आता या सगळ्या छोट्या कुंड्या मोठ्या टबमध्ये ठेवून द्या.
- मोठ्या टबमध्येही शेणखत, माती, वाळू समप्रमाणात असावे. हे मिश्रण साधारण अर्धा टब भरून ठेवा आणि त्यानंतर वरच्या अर्ध्या टबमध्ये पाणी असावे.
- पाण्याने भरलेला हा टब उन्हात ठेवा. त्याला ५ ते ६ तास थेट ऊन मिळालं पाहिजे. ६० ते ८० दिवसांनी कळी येईल.
- पाने जेव्हा पुर्णपणे टबच्या बाहेर येतील तेव्हाच या कमळाला खत घाला. आधी घालू नका. अन्यथा पाने खराब होऊन जळून जातील.
- दर तीन ते चार आठवड्यांनी कमळाला खत घालावे. त्यासाठी एका पेपर नॅपकीनमध्ये खत घ्या. त्याची पुरचुंडी करून ती रबराने किंवा दोऱ्याने बांधा. त्यानंतर ही पुरचुंडी टबमधल्या मातीत खाेचून द्या. या टबमध्ये कायम पाणी राहील याची काळजी घ्या.