नर्सरीत झाडं घ्यायला गेलो की तिथे आपल्याला एका पेक्षा एक आकर्षक सकलंट्स (succulent plants) दिसतात. एवढीशी असणारी ही रोपं एवढी छान असतात की बघता क्षणीच त्यांना खरेदी करण्याचा मोह होतो. आपल्या नेहमीच्या झाडांपेक्षा ही जरा महागडी असतात. पण तरी आपण ती घेतो आणि मोठ्या हौशीने आपल्या घरात, अंगणातल्या सावलीत, बाल्कनीत ठेवून देतो. पण काय होतं काही कळत नाही आणि अचानक १५- २० दिवसांनी ही रोपटी सुकू लागतात. पानं गळून पडतात आणि मग ते रोपटं सगळंच सुकून जातं.. (How to take care of succulent)
सकलंट्स घरी आणणाऱ्या प्रत्येकीला हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो. मागच्यावेळी आपण काय चुका केल्या त्या आपण आठवताे, पुन्हा नव्या उत्साहात नवं सकलंट घरी आणतो. पण यावेळीही व्हायचा तो गोंधळ होतोच आणि सकलंट काही दिवसातच मान टाकायला सुरुवात करतं.. त्यामुळेच सकलंट रोपट्यांची काळजी कशी घ्याची याचं एक विशिष्ट तंत्र आहे, ते समजून घ्या आणि त्यानंतरच रोपटं घरी आणा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे असलेल्या हवामानात सगळीच सकलंट तग धरू शकत नाहीत. त्यामुळे सकलंट घ्यायचंच असेल तर त्यातत्या त्यात आपल्याकडे कोणतं टिकू शकेल, हे जाणून घ्या आणि त्यानंतरच खरेदी करा.
सकलंट्सच्या बाबतीत ही काळजी घ्या...१. असं तयार करा पॉटींग मिश्रणसकलंट्स का मरतात, याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांना दिलं जाणारं जास्त पाणी. या झाडांची पानं जाड असतात आणि त्यांच्यात भरपूर पाणी असतं. त्यामुळे सकलंट्सला खूप कमी पाण्याची गरज असते. त्यामुळे जे मिश्रण पाणी धरून ठेवू शकणार नाही, असं मिश्रण सकलंटसाठी तयार करावं. यासाठी वाळू किंवा खडी, गार्डन सॉईल आणि कोकोपीट हे सम प्रमाणात घ्या आणि त्यात सकलंट्स लावा.
२. या रोपट्यांनाही ऊन लागतं..सकलंट आहेत, म्हणजे ती कायम घरातच ठेवावीत, असं नाही. या झाडांनाही ऊन लागतं. तुमचं सकलंट कोणत्या पद्धतीचं आहे त्यावरून उन्हाचे तास निश्चित करा. पण त्यांना दररोज ऊन द्या. या झाडाला कायम सावलीतच ठेवलं तर निश्चितच त्याची पानं गळू लागणार. जेव्हा नव्याने सकलंट लावाल, तेव्हा एक- दोन दिवस कमी ऊन असणाऱ्या भागात ठेवा. त्यानंतर मात्र दिवसातून १ ते २ तास तरी या झाडांना ऊन मिळाले पाहिजे.
३. खूप कमी पाणी द्या..इतर झाडांप्रमाणे सकलंट्सला पाणी देऊ नका. त्यांना तीन ते चार दिवसातून एक टेबलस्पून एवढे पाणी पुरेसे असते. यात तर तुमच्याकडे स्नेक प्लांट असेल तर त्याला थोडे जास्त म्हणजेच २ ते ४ चमचे पाणी लागेल. या झाडांची कुंडी थोडी उंचावर ठेवा. जर कुंडीखाली पाणी साचून राहत असेल तर ते ही या झाडांसाठी हानिकारक ठरू शकते.