Join us  

भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 1:00 PM

How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं?

ठळक मुद्देउन्हाळ्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी घेताना या काही गोष्टी  नक्की लक्षात ठेवा..

अंगणात, बाल्कनीत इतर कोणती झाडं असो किंवा नसो... तुळस मात्र असतेच असते... मग कधी ती छान  अशा वृंदावनात सजलेली दिसते किंवा मग कधी एखाद्या कुंडीत थाटात फुललेली दिसते... एरवी कधी  तुळशीची खूप विशेष काळजी घ्यावी लागत नाही. किंवा तुळशीचं रोप छान फुलावं म्हणून तिच्यासाठी खूप  काही वेगळं करण्याचीही गरज नसते. त्यामुळेच तर अशी बहुगुणी तुळस (gardening tips for Tulsi plant) जेव्हा उन्हाळ्यात सुकू लागते, तेव्हा  तिची खूप काळजी वाटू लागते.. म्हणूनच उन्हाळ्यात तुळशीच्या रोपट्याची काळजी घेताना या काही गोष्टी  नक्की लक्षात ठेवा.. (care of Tulsi in hot summer)

 

उन्हाच्या कडाक्याने तुळस सुकू नये म्हणून....१. तुळशीला पाणी घालताना...उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी लागतं.. त्यामुळे मग सरसकट सगळ्याच झाडांना भरपूर पाणी घातलं जातं. उन्हाळ्यात जर तुळस सुकलेली दिसत असेल तर आधी कुंडीतली माती तपासा. तुळशीला पाणी खूप जास्त होत असेल तरीही ती सुकू शकते. उन्हाळ्यात झाडांना पाणी जास्त घालावं हे खरं. पण तुळशीला खूप जास्त पाणी नको. माती ओलसर राहील एवढंच पाणी घाला. अति पाणी टाकल्याने माती गाळ झाली असेल तरी तुळस सुकू शकते.

 

२. जागा बदलून पहा...उन्हाळ्यातलं ऊन अक्षरश: भाजून काढणारं असतं.. त्यामुळे अनेकदा असं कडाक्याचं ऊन सहन न झाल्यानेही तुळस सुकते. त्यामुळे काही उन्हाळा सरेपर्यंत तुळशीची जागा बदलून पहा. दुपारचं रणरणतं ऊन ज्याठिकाणी येणार नसेल, त्याठिकाणी तुळशीला ठेवून पहा.. जागा बदलणे शक्य नसल्यास तुळशीवर एखादे कापड लावा. जेणेकरून ऊन थेट तुळशीवर पडणार नाही. 

उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान!

३. छाटणी करातुळशीवर खूप जास्त मंजिरी येऊन बीजनिर्मिती होत असेल तरी या कारणानेही तुळस सुकू शकते. त्यामुळे अशावेळी रोपाची सगळ्या बाजूंनी थोडी थोडी छाटणी करा. काही दिवसांतच फांद्यांवर नवी पालवी फुटून रोप भरगच्च बहरलेले दिसेल. 

 

४. माती तपासून पहा...वरील सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण तरीही तुळस सुकते आहे... असं वाटत असेल तर कुंडीतली माती तपासून पहा. खूप दिवसांत माती बदलली गेली नसेल तर तुळशीला आवश्यक ती पोषणमुल्ये न मिळाल्याने ती सुकू शकते. त्यामुळे एकतर माती बदला किंवा मग कुंडीतील मातीचा वरचा थर थोडा उकरा आणि त्यामध्ये थोडंसं शेणखत टाका. असं करताना मुळांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या.  

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीसमर स्पेशलगच्चीतली बाग