Join us  

Gardening Tips : गुलाबाला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, उन्हाळ्यातही फुलतील गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 10:49 AM

Gardening Tips : रोज नियमाने पाणी घालूनही आपला गुलाब थोडा हिरमुसला असेल तर त्याच्याकडे थोड्या निगुतीने लक्ष देण्याची गरज असते. पाहूयात गुलाबाला पूर्वीसारखी फुलं यावीत म्हणून काय करावे....

ठळक मुद्देआपण एखाद्या चांगल्या नर्सरीतून खत आणून ते कुंडीतील मातीमध्ये घालू शकतो. त्यामुळे रोपाचे पोषण होईलकचरा काढून माती थोडी वरखाली केल्यास झाडांची चांगली वाढ होते.

आपण सगळेच रोज इतक्या धावपळीत असतो की विचारता सोय नाही. घरातील कामे, बाहेरील कामे, ऑफीस, नातेवाईक, सणवार यांतून आपल्याला आपले छंद जोपासायला अजिबातच वेळ होत नाही. अनेकदा आपण आपल्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रिलमध्ये मस्त छोटी बाग करु म्हणतो पण ते काही केल्या आपल्याला जमत नाही. मग आपण किमान तुळस, मोगरा, जास्वंद, झेंडू, सदाफुली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुलाबाचे काही प्रकार अशी रोपे तरी आवर्जून लावतोच. आपण या रोपांना नियमित पाणी घालतो. त्यांना हवा-उजेड मिळेल असे पाहतो, पण त्याहून जास्त त्यांची मशागत करायला आपल्याला जमतेच असे नाही (Gardening Tips) . रोजच्या दगदगीत झाडाला पाणी घालताना अचानक गुलाबाला फूल आलेले पाहून आपण मनोमन खूशही होतो. पण बरेच दिवसांपासून आपल्या गुलाबाला फुलंच (Rose plant) येत नसतील तर? आपण रोज नियमाने पाणी घालूनही आपला गुलाब थोडा हिरमुसला असेल तर त्याच्याकडे थोड्या निगुतीने लक्ष देण्याची गरज असते (Home Gardening) . पाहूयात गुलाबाला पूर्वीसारखी फुलं यावीत म्हणून काय करावे....(How to take care of rose plant)

(Image : Google)

१. गुलाबाचं रोप वाळून गेल्यासारखं झालं असेल तर त्याच्या वाळलेल्या फांद्यांचे थोडे कटींग करा. त्याची पाने आणि फांद्या कोरड्या पडल्यासारखी झाली असतील तर स्प्रेचा वापर करुन त्यांच्यावर नियमितपणे पाणी घाला. नव्याने कोंब येत आहेत का याकडे लक्ष ठेवा. कदाचित पाने आणि फांद्यांचा भार जास्त झाल्यानेही झाडाची योग्य वाढ होत नाही, अशावेळी कटींग केल्यावर नवीन पाने आणि फुले येतात.

२. अनेकदा आपण झाडांना पाणी घालत राहतो पण झाडाकडे बारकाईने पाहत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी झाडाकडे बारकाईने पाहा. एखादी किंड लागली असेल किंवा अगदी मुंग्या, इतर किटक झाडामध्ये असतील तरीही झाडाची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. अशावेळी योग्य ती माहिती घेऊन झाड़ावर किटकनाशके फवारा. त्यामुळे कीड निघून जाण्यास मदत होईल आणि पहिल्यासारखी फुले येण्यास सुरुवात होईल.

३. आपल्या रोपांच्या कुंड्या या अनेकदा गॅलरीमध्ये किंवा खिडकीच्या ग्रिलमध्ये असतात. आपण झाडांना पाणी घालतो पण या कुंड्यांमध्ये झाडाचा पाला, पक्ष्यांची विष्ठा, पिसे किंवा इतरही कचरा पडलेला असतो. अशावेळी लक्ष देऊन कुंडीतील कचरा साफ करणे महत्त्वाचे आहे. हा कचरा काढून माती थोडी वरखाली केल्यास झाडांची चांगली वाढ होते. काही महिन्यांनी पूर्ण माती बदलून पाहा. 

(Image : Google)

४. काही वेळी रोपांना नुसते पाणी आणि हवा-उजेडाची आवश्यकता नसते. तर त्यांना पोषण मिळावे यासाठी खताचीही आवश्यकता असते. त्यामुळे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून सुटीच्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी मिळून झाडांची चांगल्या पद्धतीने मशागत करणे गरजेचे आहे. यासाठी आपण एखाद्या चांगल्या नर्सरीतून खत आणून ते कुंडीतील मातीमध्ये घालू शकतो. त्यामुळे रोपाचे पोषण होईल आणि आपल्याला पूर्वीसारखे गुलाब पुन्हा मिळू शकतील. खत म्हणून तुम्ही घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताचाही वापर करु शकता. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स