हवामानातील बदलामुळे ज्याप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात तसेच वातावरणातील इतर सगळ्या सजीवांमध्ये हे बदल होत असतात. आपल्या शरीराला ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे झाडांनाही जास्त ओलावा गरजेचा असतो. पण तो मिळाला नाही तर ती कोमेजून जातात. आपण अतिशय आवडीने आपल्या घराच्या गॅलरीत किंवा खिडकीच्या ग्रीलमध्ये फुलांची किंवा शोभेची काही रोपे लावतो(Gardening Tips) . रोजच्या धावपळीत सकाळी उठल्यावर आपण या रोपांना पाणीही घालतो. पण दिवसभर मात्र आपल्याला त्यांच्याकडे पाहायला फारसा वेळ होत नाही. फारतर एखाद्या वीकेंडला आपण वेळ देऊन त्यांची मशागत करतो. पण ऋतूबदलाचा आपल्यावर ज्याप्रमाणे परिणाम होत असतो त्य़ाचप्रमाणे या रोपांवरही होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. थंडीचा कडाका कमी होऊन हवामानातील उष्णता आणि उन्हाचा तडाखा वाढायला लागल्यामुळे कुंडीतील रोपे सुकायला लागतात. पण असे होऊ नये आणि ही रोपे नेहमीसारखीच छान ताजीतवानी राहावीत यासाठी घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय पाहूयात.
१. रोपांना दोन वेळा पाणी द्या
साधारणपणे आपण रोपांना सकाळी उठल्यावर पाणी घालतो. एरवी सकाळी एकदा घातलेले पाणी रोपांसाठी पुरेसे असते. पण उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रोपे कोमेजून जाण्याची शक्यता असते. अशावेळी संध्याकाळी आपण कितीही गडबडीत असलो तरी रोपांना पुन्हा एकदा पाणी घालण्यास विसरु नका. नाहीतर कडक उन्हामुळे रोपे सुकायला लागतात आणि वर्षभर काळजी घेऊन वाढवलेली, छान फुले देणारी ही झाडे काही दिवसांतच वाळून जातात. असे होऊ नये म्हणून कुटुंबातील दोघांनी दोन वेळेला रोपांना पाणी देणे अतिशय आवश्यक आहे.
२. रोपांसाठी एखादी शेड तयार करा
साधारणपणे रोपांसाठी हवा, उजेड आणि पाणी या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या तर रोपांची चांगली वाढ होते. पण या तिन्ही गोष्टी योग्य त्या प्रमाणातच असायला हव्यात, त्या कमी-जास्त झाल्या तर त्यांच्या वाढीसाठी ते धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्यात असणारा ऊन्हाचा तडाखा रोपांना सहन होत नाही. त्यामुळे एरवी उजेडासाठी थोडी उन्हात ठेवलेली रोपे ऊन्हाळ्यात एकाएकी कोमेजून जायला लागतात. अशावेळी या रोपांवर एखादी तात्पुरती शेड घालणे फायद्याचे ठरते. यामध्ये तुम्ही घरातील एखादे बेडशीट, न लागणारी साडी यांचा वापर करुन तात्पुरती शेड तयार करु शकता. यामुळे रोपांना सावली मिळेल आणि ती वाळून जाणार नाहीत.
३. रोपांची जागा बदला
आपण ऊन लागण्यासाठी रोपांच्या कुंड्या त्या पद्धतीने ठेवलेल्या असतात. पण गॅलरीत ज्याठिकाणी थोडे कमी ऊन आहे अशाठिकाणी काही महिन्यांसाठी या कुंड्या हलवून ठेवता येऊ शकतात. तसेच एखाद्या खिडकीच्या ग्रीलमध्ये तुलनेने कमी ऊन येत असेल तर या कुंड्यांची खोडीली तात्पुरती बदलता येऊ शकते. असे केल्याने वर्षभर जपलेली रोपे खराब न होता आहेत तशीच ताजीतवानी राहण्यास मदत होईल. आपल्याला कुंड्या हलवण्याचा थोडा त्रास होईल. त्यासाठी थोडा वेळही द्यावा लागेल, पण वीकेंडला घरातील सगळ्यांनी मिळून हे काम केल्यास आपली रोपे आहेत तशी राहतील आणि आपल्या घराची शोभा वाढवण्यास मदत करतील.