कुंडीतली झाडं चांगली वाढावीत, झाडांना भरपूर फुलं यावीत यासाठी झाडांची वेळोवेळी काळजी घेणं गरजेचं असतं. दोन महिन्यातून एकदा झाडांना खतंही (homemade fertilizers for plants) घालावं लागतं. बाहेरचं खत आपण नियमितपणे देतो. पण घरी नेहमीच तयार होणारं आणि झाडांसाठी अतिशय पौष्टिक ठरणारं एक खत मात्र आपण विसरून जातो. ते खत म्हणजे केळीच्या साली. केळी खाऊन केळीची सालं (use of banana peel) फेकून देऊ नका. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांचा दाेन पद्धतीने वापर करा. बघा तुमची बाग कशी छान फुलून येईल.
झाडांसाठी केळीच्या सालींचे फायदे (benefits of banana peel)
- केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅंगनीज, लोह, झिंक खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केळीच्या सालींचा उपयोग होतो.
- एखाद्या झाडांची पानं सुकत असतील किंवा मग पान गळून फांदी सुकत चालली असेल, तर त्या फांदीवर, पानांवर केळीच्या साली घासा. त्यामुळे फांदी किंवा पानांवरचा आजार कमी होईल आणि पानं पुन्हा चमकदार होतील.
खत म्हणून कसा करायचा केळीच्या सालांचा वापर
पुढील दोन पद्धतींनी तुम्ही केळीच्या साली तुमच्या बागेसाठी वापरू शकता. दोन्हीही पद्धती अतिशय परिणामकारक आहेत. यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तिचा वापर काही दिवस नियमित करा. झाडांच्या वाढीमध्ये आणि फुलांच्या संख्येत नक्कीच खूप चांगला बदल दिसून येईल.
१. केळीच्या सालीची पावडर
केळीच्या साली जमा करा आणि पेपरवर किंवा एखाद्या भांड्यात टाकून उन्हामध्ये चांगल्या वाळू द्या. अगदी २- ३ दिवसांतच केळीची सालं चांगली वाळतील. काळी पडतील आणि थोडी कडक होतील. त्यानंतर एकतर खलबत्त्यामध्ये टाकून या वाळलेल्या पानांची पावडर करा किंवा मग सगळ्यात सोपं म्हणजे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. ही पावडर थोडी थोडी कुंडीतल्या मातीत भिरकावून द्या.
२. केळीच्या सालीचे पाणी
हा उपाय करण्यासाठी केळीची सालं पाण्यात भिजत घालावी लागतात. साधारणपणे एका केळीचं साल असेल तर ते एक मग पाण्यात भिजत घालावं. १० ते १२ तास सालं पाण्यात भिजल्यानंतर साल काढून टाका आणि पाणी मात्र झाडांना द्या. एकाच झाडाला सगळं पाणी न घालता थोडं- थोडं करून सगळ्या झाडांना द्या. केळीच्या सालींचं पाणी हे झाडांसाठी उत्तम टॉनिक आहे.