Travelling tips, automatic watering ideas to plants: दिवाळीनंतर साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात सुटीसाठी बाहेरगावी जाण्याचं प्लॅनिंग केलं जातं. ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशन म्हटल्यावर आपोआपच पाऊलं आणि मन घराबाहेर झेप घेऊ लागतं. बाहेरगावी जाण्याचं प्लॅनिंग ठरलं आणि त्याकाळात घरी कोणीच असणार नसेल, तर मग जीवापलिकडे जपलेल्या आपल्या झाडांचं काय होणार, याची काळजी वाटू लागते. आपण वापस येईपर्यंत झाडं सुकणार तर नाहीत ना, याची काळजी काही जणींना त्यांच्या पुर्ण प्रवासात लागलेली असते. आपण बाहेर आणि मन मात्र झाडांकडे अशी अवस्था होऊ द्यायची नसेल, तर झाडांना आपोआप पाणी मिळेल अशी काहीतरी व्यवस्था करून ठेवा...
अनेक जणी गावाला जाताना त्यांच्या शेजारणीला किंवा काम करायला येणाऱ्या मावशींना झाडांना पाणी टाका, असं सांगून जातात. पण अशी विश्वासाची कामवाली मावशी आणि हक्काची शेजारीण प्रत्येकीकडेच नसते ना. म्हणूनच तर आता बाहेरगावी गेल्यावर झाडांना पाणी देण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरजच नाही, असे हे काही भन्नाट उपाय करून बघा.
घरी कुणी नसताना झाडांना पाणी देण्याचे उपाय
१. दोऱ्यांचा वापर करा (diy-wick-watering-system)
तुम्ही ४ ते ५ दिवसांसाठी बाहेर जाणार असाल आणि तुमच्याकडची झाडं ही खूप जास्त पाणी लागणारी नसतील, म्हणजेच ज्या झाडांना एक दिवसाआड पाणी लागतं अशी असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्याकडची सगळी झाडं स्टॅण्डवर असतील तर ती जमिनीवर आणून गोलाकार मांडून ठेवा. यानंतर या झाडांच्या मध्यभागी पाण्याने भरलेली एक मोठी बादली, टब असं काही ठेवा.
आता जेवढ्या कुंड्या आहेत, तेवढ्या दोऱ्या आपल्याला लागणार आहेत. या दोऱ्या काॅटनच्या असाव्यात. आपल्या पेटीकोट किंवा सलवारमध्ये जो नाडा असतो, तो हा उपाय करण्यासाठी वापरा. दोरीचे एक टोक बादलीत खोलवर बुडेल असे ठेवा आणि दुसरे टोक कुंडीत झाडाच्या मुळाशी खोचून टाका. असंच प्रत्येक कुंडीला करा. एका मोठ्या बदलीतून ६- ७ झाडांची व्यवस्था होऊ शकते. जर आणखी कुंड्या असतील, तर त्यांच्यासाठी अशीच दुसरी व्यवस्था करा. दोरीमुळे पाणी हळूहळू झाडांकडे झिरपते आणि माती ओली राहण्यास मदत होते. तुम्ही ४- ५ दिवसांनी आल्यावर झाडं तुम्हाला नक्कीच हिरवीगार दिसतील.
२. बाटलीचा वापर करा use bottle
बाटलीचा वापर करून आपल्याला झाडांसाठी घरच्याघरी ठिबक सिंचन पद्धती तयार करता येते. यासाठी जेवढ्या कुंड्या असतील, तेवढ्या बाटल्या लागतात. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बाटलीच्या झाकणाला एक छोटे छिद्र करा. सेप्टीपीनने जेवढे छिद्र होईल त्याच्या थोडे मोठे छिद्र करावे. यानंतर बाटली पाण्याने गच्च भरा आणि ती कुंडीमध्ये उपडी करून ठेवा. यामुळे झाडांना कायम थेंब थेंब पाणी मिळत राहील आणि माती ओलसर राहिल्याने झाडे सुकणार नाहीत. हा उपायदेखील तुम्ही ३ ते ४ दिवसांसाठी बाहेर जाणार असाल, तर उपयुक्त ठरतो.
हे देखील लक्षात घ्या....
१. हिवाळ्यात बाहेरगावी जाणार असाल, तर हे उपाय सर्वोत्तम आहेत. जर उन्हाळ्यात बाहेरगावी जायचं असेल, तर पाण्याचं प्रमाण वाढवावं.
२. उन्हाळ्यात बाहेरगावी जायचं असेल तर पहिल्या उपायात बादलीऐवजी ड्रमाचा वापर करावा.
३. उन्हाळ्यात बाहेरगावी जाताना सगळी झाडं आधी सावलीत घ्यावीत किंवा झाडांवर थेट उन येणार नाही, असा कपडा बांधावा आणि त्यानंतर वरील उपाय करावेत.