तुळस लावण्यासाठी घर खूप मोठं असण्याची गरज नाही. स्वयंपाकघराच्या खिडकीतल्या छोट्याशा कोपर्यातही तुळस छान वाढते, बहरते. मुळातच तुळस वाढण्यासाठी, बहरण्यासाठी खूप पाणी, प्रकाश आणि हवेची गरजच नसते. चांगली बहरेल असं वाटत असतानाच तुळस अचानक वठते, सुकते. कारण काही समजतच नाही. पण म्हणून तुळस पुन्हा बहरणारच नाही असं नाही. तुळस बहरण्यासाठीचे उपाय अगदीच आपल्या आवाक्यातले आणि सहज जमणारे आहेत. खत-मातीची फारशी उठाठेव न करताही वाळलेली तुळस पुन्हा हिरवीगार होवून चांगली बहरते.
Image: Google
तुळस हिरवीगर होण्यासाठी..
1. तुळस अनेक कारणांमुळे सुकते. पण ती पुन्हा हिरवीगार करणं खूपच सोपं आहे. यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर तुळशीला घालावी. यासाठी कडुलिंबाची पानं उन्हात वाळवून घ्यावीत. ती सुकली की मिक्सरमधे वाटून घ्यावी. केवळ दोन चमचे कडुलिंबाची पावडर तुळशीला घालावी. कडुलिंबाची पावडर तुळशीला घालताना माती थोडी उकरावी आणि मग ही पावडर घालावी. कडुलिंबाची पावडर घातल्यानंतर काही दिवसातच तुळशीला हिरवीगार पानं फुटलेली दिसतील.
2. तुळशीला रोज पाणी घातल्यानेही तुळशीची पानं गळतात आणि रोप सुकतं. अती ओलावा तुळशीसाठी योग्य नसतो. अशा वेळेस तुळशीच्या कुंडीतील माती उकरावी. वरची ओली माती काढून टाकावी. कोरडी माती आणि थोडी वाळू घालावी. यामुळे कोंडला गेलेला तुळशीचा श्वास मोकळा होवून तुळस पुन्हा श्वास घेवू लागेल.
Image : Google
3. तुळशीवर पांढरी बुरशी आली की अख्खं रोप खराब होतं, सुकतं. तुळशीवरच्या या बुरशी संसर्गावर कडुलिंबाची पेंड हा उत्तम उपाय आहे. ही कडुलिंबाची पेंड ही कडुलिंबाच्या बियांपासून बनवतात. हा उपाय सेंदिय खत आणि किड नियंत्रणात मोडतो. कडुलिंबाची पेंड कोणत्याही रोपवाटिकेत ( नर्सरी) उपलब्ध असते. ती नीम पेंड तुळशीच्या कुंडीतील मातीत मिसळली की काही दिवसातच तुळशीवरचा बुरशी संसर्ग निघून जातो. जर कडुलिंबाची पेंड मिळाली नाही तर कडुलिंबाची 20 -25 पानं घ्यावीत. ती एक लिटर पाण्यात भरपूर उकळावी. पाणी गार झाल्यावर त्यातील पानं काढून टाकावी आणि हे पाणी एका बाटलीत भरुन ठेवावं. दर पंधरा दिवसांनी कुंडीतील माती उकरुन त्यात दोन चमचे कडुलिंबाच्या पानांचं पाणी घालावं. यामुळे तुळशीला बुरशी लागत नाही.
Image: Google
4. तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावल्यानेही तुळस सुकते, जळते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती ठेवू नये. तुळशीपासून ते दूर ठेवावे. तसेच तुळस आरोग्यदायी असते म्हणून तिची पानं तोडून खाल्ली जातात. यामुळेही तुळस वठते. म्हणून तुळशीची पानं कधीही तोडू नये.